... तर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नाही

जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी अद्याप मागील गळीप हंगामातील थकीत एफ.आर.पी दिलेली नाही. तसेच त्यांच्यासह इतर कारखान्यांनी चालू गळीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. यासाठी कारखाने सुरु होण्याआधीच चालू वर्षीच्या दरासंदर्भात जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे चेअरमन, निर्णयक्षम अधिकारी, बळीराजा व अन्य शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक बोलावण्यात यावी. जर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गळीप हंगामास सुरुवात केली तर गनिमी काव्याचा अवलंब करून एकाही कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

... तर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नाही
कराड : प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देताना साजिद मुल्ला व इतर

... तर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नाही 

बळीराजाचा निवेदनाद्वारे इशारा : ऊसदरासंदर्भात  संयुक्तिक बैठक बोलावण्याची मागणी, प्रसंगी गनिमी काव्याने ऊसतोड, कारखाने बंद पाडण्याचाही इशारा 

कराड/प्रातिनिधी : 
          जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी अद्याप मागील गळीप हंगामातील थकीत एफ.आर.पी दिलेली नाही. तसेच त्यांच्यासह इतर कारखान्यांनी चालू गळीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. यासाठी कारखाने सुरु होण्याआधीच चालू वर्षीच्या दरासंदर्भात जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे चेअरमन, निर्णयक्षम अधिकारी, बळीराजा व अन्य शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक बोलावण्यात यावी. जर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गळीप हंगामास सुरुवात केली तर गनिमी काव्याचा अवलंब करून एकाही कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
         सदर निवेदन मंगळवारी 13 रोजी प्रांताधिकारी उत्तम दिघे व कराडचे नुतन डी.वाय.एस.पी डॉ. रणजित पाटील यांना देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, कामगार नेते घराळ बापू, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, विश्र्वास जाधव, प्रकाश पाटील व बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
          या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाची एफ.आर.पी अद्यापही काही कारखान्यांनी पुर्ण केलेली नाही. तरीही त्यांच्यासह अन्य कारखान्यांनी चालू गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. जोपर्यंत मागील गळीत हंगामाच्या उसाची थकीत एफ.आर.पी कारखाने देत नाहीत. तसेच चालू वर्षीच्या ऊस दाराची रक्कम जाहीर करत नाहीत. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित कारखानदारांना कारखाने सुरू करण्याची परवानगी देवू नये, असे या निवेदनात म्हटले आहे.
         तसेच शेतीसाठी लागणारे खते, बियाणे, मजुरांसह मशागतीचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यात कोरोना व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भर पडल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. यामुळे सर्व कारखान्यांनी यंदा गाळपास येणाऱ्या ऊसाला एफ.आर.पी च्या वर अधिक किती दर देणार? याच्या चर्चेसाठी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे चेअरमन, निर्णयक्षम अधिकारी, बळीराजा व अन्य शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस प्रमुख व आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्तिक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने सदर निवेदनाद्वारे केली आहे.
          त्याचबरोबर जर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी चालू वर्षीचा ऊसदर जाहीर न करताच कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास बळीराजा शेतकरी संघटना गनिमी काव्याने ऊसतोडीसह साखर कारखानेही बंद पाडेल. तसेच एकाही कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नाही. असा गंभीर इशाराही या निवेदनाद्वारे संघटनेकडून देण्यात आला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिले, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.