तासवडे मुरूम उत्खनन प्रकरण गुंडाळणार का ?

तासवडे मुरूम उत्खनन प्रकरण गुंडाळणार का ?

तासवडे मुरूम उत्खनन प्रकरण गुंडाळणार का ?

 उंब्रज / प्रतिनिधी

 

तासवडे ता.कराड येथील मुरूम उत्खनन प्रकरण गुंडाळणार तर नाही ना ? अशी शक्यता औद्योगिक वसाहत परिसरातील काही प्लॉटधारक,ग्रामस्थ दै.प्रीतिसंगमजवळ व्यक्त करीत आहेत.कायद्यातील पळवाटांच्या आधारे क्लीनचिट मिळवून नाममात्र कारवाई करून नेहमीप्रमाणे सोडून देण्याच्या प्रकार घडणार असल्याची शक्यता वराडे,तळबीड,तासवडे येथील ग्रामस्थांच्याकडून व्यक्त केली जात आहे.नाममात्र दराने जमिनी घेऊन धनाढ्य लोकांच्या घशात एवढ्यासाठी घातल्या का ? असा आर्त सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.

 

तासवडे औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर सी १/२ मध्ये उत्खनन केले आहे व तोच प्लॉट भरून घेतला असल्याची 'त्या' प्लॉट धारकाचे म्हणणे असल्याची चर्चा आहे.परंतु स्थानिक पातळीवर अजून एक प्लॉट भरून घेतल्याची मोठी चर्चा आहे.यासाठी एका प्लॉटमधील गौनखनिज उपसा करून दुसरा प्लॉट भरून घेत बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचा मोठा गवगवा झाला आहे.

 

तासवडे औद्योगिक वसाहत तासवडे,तळबीड आणि वराडे अशा तीन ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे.यामुळे महसुलच्या तीन वेगवेगळ्या सजाचे कार्यक्षेत्र येथे समाविष्ट आहे.उंब्रज ते शिवडे, वराडे, तासवडे,तळबीड या ठिकाणी मंडलअधिकारी एकच असले तरी ताळमेळ नसल्याची लोकांच्यात चर्चा आहे.तळबीड हद्दीतून वारेमाप मुरूम उपसा झाल्याबाबत दै.प्रीतिसंगमने वृत्त छापले होते.तळबीड व कोर्टीचा अतिरिक्त कार्यभार असणारे गावकामगार तलाठी हे याबाबत कायम संदिग्ध भूमिका घेताना दिसत असतात अवैध वाळू उपसा अथवा उत्खनन याबाबत कोणतीही माहिती विचारली असता टाळाटाळ करण्याच्या हेतूने परिपूर्ण माहिती देत नाहीत.

 

कराड उत्तरसह कराड दक्षिण मध्ये सुद्धा वारेमाप मुरूम उपसा होत असून महसूल विभाग गांधारीच्या भूमिकेत असल्याने कोरोना महामारीच्या आड दडी मारत आहे.गौण खनिजांची अमर्याद लूट सुरू असून शासनाच्या डोळ्यात दिवसा धूळफेक होत आहे.मसूर परिसरात तर पोकलॅनने मुरूम उपसा सुरू आहे नाममात्र रॉयल्टी भरून अमर्याद मुरूम उपसा करण्याचे लायसन महसूल विभाग देत असून यामागे फार मोठे अर्थकारण लपले असल्याची चर्चा लोकांच्यात आहे.किती रॉयल्टी भरली आणि किती गौनखनिज उपसा केला याची कोणतीही खातरजमा करून घेतली जात नाही 'आंधळं दळतंय...'अशी अवस्था जवळपास तालुक्यातील सर्वच ठिकाणी आहे.

 

तालुक्यातील सर्वच ठिकाणी जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी भरारी पथके स्थापन करून चाललेला गैरकारभार चव्हाट्यावर आणला पाहिजे आणि दोषी असणारावर कडक कारवाई करून अवैध बाबीवर लगाम लावला पाहिजे अशी अपेक्षा तमाम जिल्हावासीय व्यक्त करीत आहेत.जिल्हाधिकारी तरुण तडफदार आहे ते नक्कीच चुकीचे काम करणार्यांवर कारवाई करतील अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करीत आहेत.