धरणफुटीचे दुर्दैवी बळी  

        रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून ११ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण बेपत्ता झाले आहेत. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटते कसे, अशी शंका उपस्थित होत आहे. धरणाच्या पाण्यात बुडालेले लोक हे सरकारच्या निष्क्रियतेचे बळी असून दोषींवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. धरण बांधून १९ वर्षे झाली आहेत पण एवढ्या कमी वेळेत धरण फुटले कसे ?  या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे दुर्घटनेला धरण बांधणारी कंपनी जबाबदार असून संबंधितांवर राज्य सरकारने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

धरणफुटीचे दुर्दैवी बळी  


        रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून ११ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण बेपत्ता झाले आहेत. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटते कसे, अशी शंका उपस्थित होत आहे. धरणाच्या पाण्यात बुडालेले लोक हे सरकारच्या निष्क्रियतेचे बळी असून दोषींवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. धरण बांधून १९ वर्षे झाली आहेत पण एवढ्या कमी वेळेत धरण फुटले कसे ?  या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे दुर्घटनेला धरण बांधणारी कंपनी जबाबदार असून संबंधितांवर राज्य सरकारने कडक कारवाई करण्याची गरज आहे. धरणाला गळती लागली असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी जलसंपदा खात्याकडे केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याची डागडुजी केली असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे. जलसंपदा मंत्र्यांनी आपली जबाबदारी झटकली असली तरी त्यांनी धरणांच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहणे महत्वाचे होते. सरकारने राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून एसटी बस पुराच्या पाण्यात कोसळली होती. राज्यातील अनेक धरणांची दुरुस्ती वा स्ट्रक्चरल ऑडीट झालेले नाही. त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा असे दुर्दैवी बळी जातील.                                                                                                चिपळूणजवळील तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. पुण्याजवळील पानशेतच्या धरणफुटीची आठवण लोकांना आली. दि. १२ जुलै १९६१ रोजी पुण्यात पानशेत धरण फुटले आणि सर्वत्र हाहाकार माजला होता. या घटनेत एक हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. तिवरे धरण फुटल्याने १३ घरे वाहून गेली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सात गावे पाण्याखाली गेली आहेत. तिवरे धरणाचे पाणी शास्त्री नदी आणि वशिष्ठीच्या खाडीला मिळते. हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळ असलेला दादर पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफची पथके युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. सतत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे तिवरे धरण फुटले आहे. या गावांतील नागरिकांनी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. येथील पाटबंधारे विभाग निष्क्रिय असून लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे, असे दिसते. मुंबईसह कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या एका टोकाला आहे. तसा हा भाग दुर्गम असून तिवरे गावात बांधण्यात आलेले धरण २००० साली पूर्ण झाले होते. या धरणाच्या पाण्याची पूर्ण संचय पातळी १३९  मीटर आहे. या धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता २.४५  दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होत होता.  प्रशासनाच्या २ जुलैच्या अहवालानुसार हे धरण २७.५९ टक्के भरले होते. धरणात एकूण १३१ मीटर पाणीपातळी होती. या धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती लागली होती. गेल्यावर्षी या गळतीत वाढ झाली होती. या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले होते. गळतीमध्ये दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून गेल्यावर्षी या धरणाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याप्रकरणी कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.                                                                                                          विरोधकांनी या प्रकरणी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करुनही दुरुस्ती न झाल्यामुळे गावं पाण्याखाली असून लोक बेपत्ता आहेत. अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार आहे ? असा गंभीर सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. तिवरे धरण फुटीनंतर घडलेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल, असे नेहमीचे उत्तर दिले आहे. परंतु आता बैल गेला आणि झोपा केला अशी राज्य सरकारची परिस्थिती झाली आहे. जेव्हा तिवरे धरण परिसरातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाकडे धरण गळतीबाबत तक्रार केली होती, त्यावेळी गांभीर्याने दाखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती. मुंबई, पुणे येथे सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे इमारतीच्या भिंती पडून ३७ जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटून सात गावांत पाणी शिरले तसेच ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजूनही २४ जन बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य सरकार, पाटबंधारे विभाग यांनी तिवरे धरणाच्या गळतीकडे लक्ष देणे गरजेचे होते. पावसाळ्यापूर्वी सर्व धरणांची पाहणी होणे म्हत्वाचे असते. धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट वेळेत झाले पाहिजे. अन्यथा असे दुर्दैवी बळी नेहमीच जातील.