टीआरपी आणि सोशल मिडीयाची विश्वासार्हता धोक्यात

आपली वृत्तवाहिनी कशी प्रसिद्धीझोतात आहे आणि लोकांना, आम्ही केलेले वृत्तांकन किती आवडते हे दाखवण्याचा अट्टाहास केव्हा ना केव्हा भारी पडणारच होता ! अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचे मुंबई पोलिसांनी बिंग फोडले आहे. जाहीराती मिळवण्यासाठी टीआरपी वाढवणाऱ्या अशा वाहिन्यांवर जाहिरातदारांनी बहिष्कार टाकण्याची गरज आहे.

टीआरपी आणि सोशल मिडीयाची विश्वासार्हता धोक्यात
cartoon by Ashok Sutar
कृष्णाकाठ / अशोक सुतार

टीआरपी आणि सोशल मिडीयाची विश्वासार्हता धोक्यात

                काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेऊन सोशल मिडीया चुकीच्या बातम्या पसरवत असल्याने काही संशयित अकाउन्ट धारकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परमवीर सिंह यांनी अशी संशयित अकाउन्ट खाती शोधून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. सोशल मिडीयावर फेक अकाऊंट तयार करून राज्य सरकार, महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणे, राज्य सरकारमधील गृहमंत्र्यांना जोकर म्हणणे मुळीच समर्थनीय वाटत नाही. तसेच काही वृत्तवाहिन्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस, राज्य सरकारवर मोठी टीका केली होती. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला आहे. यात सध्या तरी तीन टीव्ही चॅनल्सची नावे समोर आली आहेत. या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु आहे, असे परमवीर सिंह यांनी म्हटले आहे. काही वृत्तवाहिन्यांना मोठा टीआरपी मिळत असल्याची हवा निर्माण केली जाते. याच टीआरपीच्या कृत्रिम बळावर काही वृत्तवाहिन्या जास्त पैसा मिळवत असून कोणावरही टीका करत असल्याचे दिसून येत आहे. स्वतःची टीआरपी वाढवणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे बिंग मुंबई पोलिसांनी बाहेर काढले, हे स्तुत्य आहे. टीआरपी जास्त असल्याची हवा निर्माण करून जनतेत आम्हीच प्रसिद्ध आहोत, अशी टिमकी वाजवणाऱ्या चमको बहाद्दरांचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला ते बरेच झाले. अशी प्रवृत्ती गेल्या पाच- सहा वर्षांत वाढली आहे. स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारे प्रसिद्धी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातात, हे या घोटाळ्यावरून दिसले आहे. वृत्तवाहिन्यांची टीआरपी आणि सोशल मिडीयावरील विश्वासार्हता आज राहिलेली नाही. देशात विकृती वाढीस लागली असून संविधानिक मुल्यांची कुचेष्टा सुरु असल्याचे दिसत आहे.                                           टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटमध्ये (टीआरपी) फेरफार करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या वाहिन्यांच्या मागे त्यांचे गॉड फादर कोण आहेत, टीआरपी प्रकरणातील पैसा कोणत्या अवैध धंद्यातून येतो, याचाही यथावकाश तपास होईल. परंतु यामुळे सदर वृत्तवाहिन्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेला कीड लागणे धोकादायक आहे. टीआरपी घोटाळ्यामुळे काही चॅनेल्सना ३० हजार कोटींचा नफा झाल्याची चर्चा आहे. टीआरपी घोटाळ्याबद्दल परम वीर सिंह यांनी म्हटले आहे, हंसा  नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. या चॅनलच्या वतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले जायचे, असेही पोलिसांनी म्हटले आहे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांना गुरुवारी अटक करण्यात आली, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या घोटाळ्याप्रकरणी फक्त मराठीचे मालक शिरीष पट्टनशेट्टी, बॉक्स सिनेमाचे मालक नारायण शर्मा यांच्यासह हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा माजी रिलेशनशीप मॅनेजर विशाल वेद भंडारी आणि बोम्पाली मेस्त्री यांना अटक केली. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या आधिपत्याखालील भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (बीएआरसी) वाहिन्यांच्या लोकप्रियतेबाबत संशोधन करते आणि त्याआधारे गुण किंवा टीआरपी निश्चित करते. या मोजमापासाठी बीएआरसीने देशभरात सुमारे तीन हजार बॅरोमिटर बसविले आहेत. बॅरोमिटरद्वारे दिवसाच्या कोणत्या कालावधीत सर्वाधिक टीव्ही पाहिला जातो, कोणती वाहिनी जास्त पाहिली जाते, कोणता कार्यक्रम सर्वाधिक पाहिला जातो याबाबतची निरीक्षणे नोंदवली जातात. टीआरपी नोंदविणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना विश्वासात घेऊन खोट्या नोंदी तयार करून हा गैरप्रकार केला. या घोटाळ्याचा सुगावा हंसा रिसर्च ग्रुपला जून महिन्यात लागला. त्यानंतर ग्रुपने यातील आरोपी भंडारी याला कामावरून कमी केले होते. हंसा ग्रुपने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. अटक आरोपी भंडारी, मेस्त्री यांच्या चौकशीतून रिपब्लिकसह अन्य वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढविण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा पोलीस आयुक्त सिंग यांनी केला. बीएआरसीने केबल किंवा डिशद्वारे वाहिन्यांचे प्रक्षेपण विकत घेणाऱ्या तीन हजार ग्राहकांच्या घरी टीआरपी मोजण्यासाठी गुप्तपणे यंत्रणा बसवली. बीएआरसीने या कामासाठी हंसा रिसर्च ग्रुपची निवड केली. त्यातील अधिकाऱ्यांनी यांतील दोन हजार ग्राहकांना विश्वासात घेतले. महिन्याकाठी किरकोळ रक्कम देण्याच्या आमिषावर ग्राहकांना दिवसभर किंवा दिवसातील काही ठराविक तास ठराविक वाहिन्या सुरू ठेवण्यासाठी तयार केले. या कृतीमुळे मिळालेल्या नोंदींआधारे अपेक्षित असलेल्या ठराविक वाहिन्यांचे टीआरपी वाढवण्यात आले.         आपली वृत्तवाहिनी कशी प्रसिद्धीझोतात आहे आणि लोकांना, आम्ही केलेले वृत्तांकन किती आवडते हे दाखवण्याचा अट्टाहास केव्हा ना केव्हा भारी पडणारच होता ! अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचे मुंबई पोलिसांनी बिंग फोडले आहे. जाहीराती मिळवण्यासाठी टीआरपी वाढवणाऱ्या अशा वाहिन्यांवर जाहिरातदारांनी बहिष्कार टाकण्याची गरज आहे. काही वृत्तवाहिन्यांवरील पत्रकार दुसऱ्यांना धमकी दिल्यासारखे बातमी वा बातमीचा दृष्टीकोन प्रसारित करीत असतात. अशा चमको बहाद्दरांना पोलिसांनी धडा शिकवला हे बरे झाले.                                                                                            रिपब्लिक टीव्हीची सध्या मोठी हवा असून संपादक अर्णव गोस्वामी हे, मी म्हणतो तेच योग्य, इतरांनी केलेला दावा कसा चुकीचा आहे, हे नेहमीच ठासून सांगतात. एवढेच नव्हे तर सुशांत सिंह आत्महत्या तपास प्रकरणात राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस कसे अपयशी ठरले यावरच सदर वृत्तवाहिनी आणि इतर काही वृत्त वाहिन्यांनी २४ बाय ७ असे वृत्तांकन केले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने मुंबई पोलिसांच्या तपासापेक्षा जास्त प्रगती केली नाही, हेही दिसून आले. मुंबई पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केला होता, हे उघड झाले. गेली तीन महिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर २४ तास बातम्या प्रसारित करणाऱ्या या वृत्तवाहिन्यांनी केंद्र सरकारची चुकीची धोरणे, वाढते महिला अत्याचार, शेतकरी प्रश्नांवर दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. अशी पित पत्रकारिता करून या वृत्तवाहिन्यांना काय साधायचे आहे ? काही वृत्तवाहिनीवाले उठसुठ कोणालाही दोष देतात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक व्यासपीठावर बसून आव्हान देतात, एकेरी भाषेत बोलतात. एवढी हिंमत यांच्यात आली कुठून ? मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला, त्यामुळे खोट्या लोकांची भामटेगिरी जनतेच्या लक्षात आली आहे. काही फेक खाती तयार करून सोशल मिडीयावर राजकीय पक्ष, नेते यांच्यावर चिखलफेक करण्याचे काम सुरु आहे. कोणी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध केला तर कंपूबाजी करून त्याला घेरले जाते. सोशल मिडीयावर तर हीन भाषेत अनेकांचा पाणउतारा करण्याची अनेकांची स्पर्धा सुरु आहे. यातही अनेक कंपन्या ट्रेंड करत असल्याचे दिसते. सोशल मिडीयावर फेक खाती असलेले हे बाजारबुणगे दिवसभरातून दर मिनिटाला २५ ट्विट्स कसे काय करू शकतात ? यामागे मोठी कंपनी, मोठे मनुष्यबळ संघटीत राहून कार्यरत असल्याशिवाय हे होऊ शकत नाही.                                                                                                                              सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून विरोधकांच्या बदनामीची मोहीम पद्धतशीरपणे सुरु आहे. सुशांतसिंग प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता ३ महिन्यांत ४० हजार ट्वीट / पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला २५ ट्विट्स केल्याचे दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आले आहेत, ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत (SSR). त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक प्रकाची मोहीम चालवली गेली तसेच सुशांत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत होते, असे चित्र रंगवले गेले. भाड्याने घेतलेल्या सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही पद्धत असून याच माहितीच्या आधारावर काही न्यूज चॅनेल्स जोरजोरात अपप्रचार करतात. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून त्यावर आरुढ होत काही नेते कृत्रिम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. सुमारे ८० हजार बोगस अकाऊंटच्या माध्यमातून बदनामीची मोहिम राबवल्याचे मुंबई पोलिसांनी उघड केले आहे. मिशीगन विद्यापीठानेसुद्धा अशा मोहिमेत भाजपाचा हात असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. फेसबुक व भाजपाच्या अभद्र युतीचा पर्दाफाशही वॉल स्ट्रिट जनरलने नुकताच उघड केला होता. सध्या सोशल मिडीयावर राज्यातच नव्हे तर देशातही दोन गट पडले आहेत. देशात नवी विभाजनवादी व्यवस्था निर्माण होऊ पाहत आहे आणि ती धोकादायक आहे.