आशासेविकेंचे मानधन देण्यासाठी ग्रामपंचायतीची टाळाटाळ

ऑक्सिमिटर वाटपात दुजाभाव

आशासेविकेंचे मानधन देण्यासाठी ग्रामपंचायतीची टाळाटाळ

आशासेविकेंचे मानधन देण्यासाठी ग्रामपंचायतीची टाळाटाळ

ऑक्सिमिटर वाटपात दुजाभाव

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशसेविकांना ग्रामपंचायतीच्या वतीने मिळणारे मानधन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.सर्वे व आरोग्यतपासनी करायची की मानधन मिळण्यासाठी मनधरणी करायची अशा विवंचनेत आशासेविका व गतप्रवर्तक पडले आहेत.जीवावर उदार होऊन गल्लोगल्ली फिरायचे आणि मानधन मिळवताना हातापाय पकडायची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.हजारो लाखों रुपये पगार घेणारे घरी बसून मजेत आहेत परंतु तळागाळातील जनतेची इमानेइतबारे सेवा करण्यात व्यस्त असणाऱ्या आशा सेविकांची मात्र फरफट होत असल्याची चर्चा आहे.तसेच ऑक्सिमिटर सारख्या अतिशय महत्त्वाच्या वस्तू देताना सुद्धा ग्रामपंचायत तोकड्या स्वरूपात देत असल्याने काम कसे करायचे असा प्रश्न आशसेविकाना पडला आहे.

उंब्रज येथील ३ गतप्रवर्तक व १२ आशा सेविकांना १ महिन्याचे मानधन आजपर्यंत मिळाले असून 'सरकारी काम आणि चार महिने थांब'याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली आहे.उर्वरीत चार महिन्यांचे मानधन देतो असे उंबजचे ग्रामसेवक यांनी कराड सभापती यांना उंब्रज भेटीच्या दरम्यान सांगितले होते मात्र आजअखेर या सर्व बाबी एक भूलथापा म्हणून सिद्ध झाल्या आहेत.एकही रुपया गेल्या तीन महिन्यात ग्रामपंचायतीने मानधन म्हणून दिला नसल्याने आशासेविकेंची अवस्था दोलायमान झाली आहे.

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामपंचायतीच्या वतीने ५ ऑक्सिमिटर देण्यात आले आहेत वस्तुतः १२ आशासेविका व ३ गटप्रवर्तक असताना ५ ऑक्सिमिटर कोणत्या आधारे दिले हे विचार करण्यासारखी बाब आहे. तसेच प्रत्यक्ष किती ऑक्सिमिटर खरेदी केले याचा सुद्धा छडा लागला पाहिजे अशी चर्चा आहे.यामुळे ग्रामपंचायतीचा सावळागोंधळ सुरूच असून आण्णासाहेब कोणत्याच बाबीला नाही म्हणत नाहीत आणि काही करतही नाही अशीच चर्चा सर्वत्र पसरली आहे.

महाराष्ट्र शासनाने ४ जून रोजी प्रसिध्द केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा काढण्यासंदर्भातील शासन शुद्धीपत्रक क्र. चौविआ-२०२०/प्र.क्र.४२/वित्त-४ ग्रामविकास विभाग या परिपत्रकानुसार अर्धवेळ स्त्री परिवार व आशा गट प्रवर्तक यांना १०००/- इतकी प्रोत्साहनपर रक्कम स्थानिक ग्रामपंचायतीने अदा करावी असा उल्लेख केलेला आहे.याबाबत टाळाटाळ उंब्रज ग्रामपंचायत करीत असून त्वरित सदरचा भत्ता मिळावा अशी मागणी होत आहे 

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एकूण ५३ आशासेविका कार्यरत आहेत आणि उंब्रज येथे १२ आशासेविका व ३ गतप्रवर्तक असून यापैकी ५ आशसेविकाना उंब्रज ग्रामपंचायतीने ऑक्सिमिटर दिले आहेत. परंतु ऑक्सिमिटर हा इलेक्ट्रॉनिक पार्ट असून काही खराबी निर्माण झाली किंवा रिडींग चुकीचे दाखवले तर असे ऑक्सिमिटर वापरातून बाद करावे लागतात यामुळे उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत मोठी लोकसंख्या राहत असल्याने प्राथमिक तपासणी कामी ऑक्सिमिटर हे महत्वाचे उपकरण आहे.

डॉ. संजय कुंभार
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र