आश्चर्याचा सुखद धक्का, विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत

उंब्रज येथील आपले गाव हॉटेल चालक मित्रांचा प्रामाणिकपणा

आश्चर्याचा सुखद धक्का, विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत
आश्चर्याचा सुखद धक्का, विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत

उंब्रज / प्रतिनिधी

अजूनही प्रामाणिकपणा, माणुसकीचा झरा वाहत आहे. एका बाजुला फसवणुकीच्या अनेक घटना घडतात तर दुसरीकडे सामान्यांकडून लाखोंचे ऐवज परत केले जातात. अशा लोकांमुळे प्रामाणिकपणा जिवंत आहे.कराड तालुक्यातील उंब्रज येथील आपले गांव हॉटेल मालकांचा प्रामाणीकपणा समोर आला असून जेवण करुन गेलेल्या प्रवासी वाहन धारक ग्राहकाचे विसरलेले चौदा तोळे सोन्याचे सुमारे ७ लाखाचे दागीने उंब्रज पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे जमा केले आहेत.या घटनेमुळे माणुसकी आणि प्रामाणिकपणा टिकून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावच्या हद्दीत आपलं गांव मनपसंद फुडमॉल या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाची ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हॉटेल मालक यांनी तात्काळ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून  दागिन्यांची पिशवी संबंधित कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने कुटुंबियांनी हॉटेल मालक यांच्या प्रामाणिकपणा बद्दल आभार मानले आहेत.

त्याचे झाले असे, गुरवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघालेले एक कुटूंब जेवण करण्यासाठी शिवडे  हद्दीतील आपलं गांव मनपसंद फुडमॉल हॉटेल या ठिकाणी थांबले होते. जेवण करुन ते कुटुंब त्यांच्या गाडीने निघुन गेले. काही वेळाने ग्राहक कमी झाल्यानंतर एका टेबलला एक पिशवी विसरली असल्याचे लक्षात आले. 

हॉटेल मालक  विजयसिंह  जाधव,  दिलीपराव  पाटील, बाळासाहेब  ढवळे व अर्जुन कोळी यांनी ती पिशवी हॉटेलमध्ये त्यावेळी असणाऱ्या ग्राहकांकडे चौकशी केली असता  प्रतिसाद मिळाला नाही. सदरत्र पिशवीमध्ये सोन्याचा नेकलेस, चार पाटल्या, दोन अंगठया असा ऐवज असल्याने हॉटेल मालक यांनी तात्काळ सदर  दागीन्यांची बॅग उंब्रज पोलीस स्टेशनला जमा केली.

उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या  मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील,  हवालदार दिपक जाधव, सचिन देशमुख, कराड शहर पोलीस ठाण्याचे   राजेंद्र देशमुख, महिला पोलीस  चव्हाण यांनी पिशवी मालकांचा शोध घेवून त्यांना उंब्रज पोलीस ठाण्यात बोलावून त्या पिशवीतील वस्तूंची ओळख पटवून मालक अशफान अयाज मुलाणी, त्यांची पत्नी शर्मिन  मुलाणी  रा. चेंबुर, मुंबई यांच्या ताब्यात दागिन्याची पिशवी सुपूर्द केली. सुमारे सात लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल हॉटेल मालक विजयसिंह  जाधव,  दिलीपराव  पाटील, बाळासाहेब  ढवळे व अर्जुन कोळी यांचेसह पोलिस टिमचे  विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.