पोलीस पाटील,आरोग्य सेविका बीट अंमलदार यांनी करून दाखवले, चरेगाव कोरोना मुक्तीसाठीची धडपड कारणी लागली

पोलीस पाटील,आरोग्य सेविका बीट अंमलदार यांनी करून दाखवले, चरेगाव कोरोना मुक्तीसाठीची धडपड कारणी लागली


पोलीस पाटील,आरोग्य सेविका बीट अंमलदार यांनी करून दाखवले

चरेगाव कोरोना मुक्तीसाठीची धडपड कारणी लागली

अनिल कदम/उंब्रज

उत्तर मांड नदीकाठच्या सुजलाम सुफलाम असणाऱ्या चरेगावात एक रुग्ण कोरोना बाधित असल्याच्या बातमीने प्रशासनासह गावकऱ्यांच्या काळजात धस्स झाले होते.हसत खेळत बागडणारे गाव एका क्षणात स्तब्ध झाले,गावातील चौक,गल्ल्या, शिवार सुनसान पडले शेजारी पाजारी एकमेकांना धीर देऊ लागली प्रशासन सावध झाले आणि सुरू झाली लढाई कोरोना मुक्तीची, अघटित घडलंय कोरोना झालाय पण गडयानो हारायच नाय असं म्हणत हर हर महादेव अशी मनातल्या मनात गर्जना करत प्रशासनासह चरेगावकरांनी करोनाचा प्रसार होऊन दिला नाही आणि सर्व सूचना तंतोतंत पाळत गावात एकमेव असणारा कोरोना बाधित रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचे हसतमुख चेहऱ्याने स्वागत केले.

गाव पातळीवर पोलीस पाटील,आरोग्य सेविका,ग्रामसेवक व ग्रामपंचायत स्टाफ,तलाठी,अंगणवाडी सेविका,बिट अंमलदार ,होमगार्ड या सर्वांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचना गावपातळीवर चांगले प्रकारे राबवल्याने चरेगाव मधील संपर्क साखळी तुटण्यास मदत झाली.कोरोना बाधित रुग्ण  आढळून आल्यानंतर पंधरा दिवसानी चरेगाव मध्ये एकही रुग्ण आढळला नाही व बाधीत रुग्ण ही डॉक्टरांच्या योग्य उपचार मुळे बरा झाला व चरेगाव कोरोना मुक्त झाले तरीही यापुढे नागरिकांना भविष्यात यातुन बोध घेऊन पुन्हा रुग्ण आढळून येवु नये म्हणून सोशल डिस्टनस,मास्क,सॅनिटायझर वापर करून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे गाव आणि समाज कोरोना तसेच इतर साथीच्या आजरा पासून चार हात लांब राहणार आहे.

जिद्द मेहनत आणि चिकाटी अंगी असली तर डोंगरा एवढे दुःख सहन करण्याची ताकत मिळते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चरेगाव आहे.पोलीस पाटील,आशा सेविका आणि बिट अंमलदार यांची चिकाटी आणि तळमळ तसेच प्रखर इच्छाशक्ती मुळे कोरोनाचा प्रसार हा वाढला नाही लोक जागृती आणि प्रसंगी कायद्याचा धाक दाखवत गाव १००℅लॉक डाउन केले होते चिटपाखरूही फिरताना दहा वेळा विचार करीत होते सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तू जिथल्या तिथे मिळण्यासाठी सपोनि गोरड यांनी अचूक नियोजन केले होते ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा मोलाची साथ दिली यामुळे सर्वसमावेशक प्रयत्नांचे फळ म्हणजे चरेगाव कोरोना मुक्ती असा होतो.

बाधितरुग्ण सापडल्यावर गावातील काही टवाळखोर दंगामस्ती करत होते परंतु बिट अंमलदार लक्ष्मण जगधने यांनी दाखवलेला कायद्याचा बडगा अजून ही गावात चर्चिला जात आहे.संकटकाळी गावची एकजूट किती महत्वाची असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चरेगाव आहे गावातील तीन ठिकाणच्या दूध डेअरी मध्ये जमा होणारे दूध हे ग्रामस्थांनी गावातील सर्वच लोकांना विनामोबदला दिले अजूनही तसेच चालू आहे त्याचबरोबर भाजीपाला फळफळाव यांचे योग्य व विनामूल्य वाटप आजतागायत सुरू आहे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे गरीब श्रीमंत अशी कोणताही भेदभाव न ठेवता सरसकट सर्वाना एकमेकांनी केलेली मदत म्हणजे चरेगाव माणुसकीचे एक बोलके उदाहरण आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

गावातील लोकांनी काळजी घेणे गरजेचे

चरेगावात कोरोना बाधित रुग्ण मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेली साथ ही अतुलनीय आहे.कारण गावपातळीवर सर्वांचे बहुमोल सहकार्य झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबविता आला तसेच उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करता आली.आशा सेविका आणि  सिस्टर यांनी बिनतोड कामगिरी करीत घर टू घर तपासणी करून ताप सर्दी खोकला यांचे कोणी रुग्ण आहेत का याची तपासणी केली होती.

डॉ. संजय कुंभार
उंब्रज, वैद्यकीय अधिकारी

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

कडक अंमलबजावणी सुरूच राहणार

चरेगाव मधील कोरोना बाधित रुग्ण बरा झाला तसेच उंब्रज मधील इतर लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी कडक आणि काटेकोर अंमलबजावणी पुढील आदेश होई पर्यंत सुरूच राहणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच चरेगाव व उंब्रज मध्ये कोणत्याही प्रकारची सूट अजून लागू केली नाही यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये तसेच संचारबंदीचे काटेकोर पालन करावे

सपोनि अजय गोरड
उंबज पोलीस स्टेशन

■■■■■■■■■■■■■■■■■■■■