उंब्रजला 'सक्षम' ग्रामविकास अधिकाऱ्याची गरज

उडवाउडवीच्या उत्तरांमुळे नागरिक त्रस्त

उंब्रजला 'सक्षम' ग्रामविकास अधिकाऱ्याची गरज

उंब्रजला 'सक्षम' ग्रामविकास अधिकाऱ्याची गरज

उडवाउडवीच्या उत्तरांमुळे नागरिक त्रस्त

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा 'तोरा'ग्रामस्थांना भारी पडत आहे.मनमानी कारभारामुळे सुमारे ४० हजार तरलती लोकसंख्या असणाऱ्या गावाचा कारभार रामभरोसे राहिला आहे. ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या  कोल्हापूर,कराड,सातारा,अशा फिरतीवरील दौऱ्याने पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील महत्वाच्या गावातील कारभाराचा उडालेला बोजवारा आणि नागरिकांची खोळंबलेली कामे यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध नागरिकांच्यात असंतोष पसरला आहे.कोरोना महामारीच्या काळात अनेक ग्रामपंचायतीच्या  ग्रामसेवकांनी  जीव तोडून काम केले  परतू  उंब्रज याला अपवाद ठरले असून यामुळेच कोरोना बाधित रुग्णसंख्या व मृत्यू वाढले असल्याची चर्चा आहे. कचरा समस्या,दूषित पाणी याकडे डोळेझाक होत असून टेंडर प्रक्रियेवर जोर दिला असल्याने 'मलई' वर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा नागरिकांच्यात पसरली आहे.

टंगळमंगळ आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात माहिर असणारे ग्रामविकास अधिकारी उंब्रज येथील नागरिकांच्या मानगुटीवर आणून बसविल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार नागरिक सहन करीत आहेत.ग्रामविकास अधिकारी नक्की काय काम करीत असतात याचा थांगपत्ता ग्रामस्थांना लागत नसल्याने 'भीक नको....' असे म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे शनिवार रविवार सह लागून सुट्ट्या घेऊन शासकीय नोकरीचा येथेच्छ लाभ आण्णासाहेब घेत असल्याची नागरिकांची तक्रार असून निववल ग्रामपंचायतीकडे असणारा निधी खर्च करण्यासाठीच यांची नेमणूक वरिष्ठांनी केली असल्याची कुजबुज नागरिकांच्यात आहे.

कोरोना महामारीच्या कार्यकाळात कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी कडक वॉर्निंग देऊन सुद्धा उंब्रजच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यात काडीचाही फरक पडला नसल्याची चर्चा नागरिकांच्यात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा देण्यात धन्यता देणारे ग्रामविकास अधिकारी स्थानिकांची अवहेलना करीत असल्याची तक्रार आहे.

कोरोना महामारीच्या काळात कंटेन्मेंट झोन सील करताना नेहमीच आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांची धावपळ आणि धांदल उडाली होती.परंतु ग्रामविकास अधिकारी त्या काळात आरामशीर सातारा येथील मुक्कामी दिवस काढत होते.फवारणी बाबत सुद्धा दिशाभूल करणारी आकडेवारी दिली जात असल्याची चर्चा असून वारेमाप खर्च कोरोना महामारीच्या कार्यकाळात झाल्याची खसखस पिकली आहे.

प्रांताधिकाऱ्यांचा आदेश धुडकवला

कोरोना महामारीच्या कार्यकाळात उंब्रज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामविकास अधिकारी यांना उंब्रज येथे मुक्कामी राहण्यास बजावले होते यावेळी उंब्रज येथील सर्व शासकीय कर्मचारी,पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते त्यावेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणाचा पाढाच वाचला होता यामुळे प्रांताधिकारी यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना कडक वॉर्निंग देत हयगय केली तर कडक कारवाई करावी लागेल अशी तंबी दिली होती परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी गत सुरू असून कोरोन काळात केलेल्या कारभाराची चौकशी व्हावी अशी नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.