गुटखा बंदीला उंब्रजमध्ये लागले 'ग्रहण'

संबधित खात्याचा कानाडोळा,नाममात्र कारवाईचा बागुलबुवा

गुटखा बंदीला उंब्रजमध्ये लागले 'ग्रहण'

गुटखा बंदीला उंब्रजमध्ये लागले 'ग्रहण'

उंब्रज/प्रतिनिधी

'क्लोज'असणारी गुटखा विक्री चोरीचुपके 'ओपन'झाल्याने उंब्रज व परिसरात शासन आदेशाला हरताळ फासला जात आहे.कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने पानपट्टी व्यवसायावर कडक निर्बंध लादत लॉक ठेवायला सांगितले होते.कारण पान व गुटखा खाण्याचे सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक वाढला होता.कडक लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी यामध्ये आपला हात धुवून घेतल्याची चर्चा असून अव्वाच्या सव्वा किमतीला अवैध मार्गाने आलेला  गुटखा विक्री करून मालामाल झाले आहेत.

उंब्रज परिसरात येणारे  गुटखा तस्करीचे संपूर्ण रॅकेट प्रशासनाला माहीत असून सुद्धा चिरीमिरीच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार वारंवार घडत असून प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बघत बसले असल्याने नागरिकांच्यात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात संबधित खात्याने काही जणांवर कारवाईचा बागुलबुवा उभा केला परंतु 'वरदक्षणा'मिळाल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती सुरू झाली आहे.तंबाखूजन्य पदार्थाने कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगाची लागण होण्याचा धोका संभवत असल्याची जाहिरात गुटख्याच्या पुडीवरच लिहलेली आहे तरी सुद्धा तरुण पिढी आपले आयुष्य बरबाद करीत आहे.

 

अन्न भेसळ खात्याचा कानाडोळा 

राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.परतू खुलेआम मिळणारा गुटखा व उघड उघड होणारी वाहतूक हि नेमकी कोणाची मिलीभगत आहे.याचा सोक्षमोक्ष लावणे प्रशासनाचे प्रथम कर्तव्यं आहे.यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊन अनेक आजारांना बळी पडत आहे तसेच कोरोना महामारीचा अजून समूळ नायनाट झाला नसून दुसरी लाट येण्याचा अंदाज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे यामुळे अवैध गुटखा विक्रीवर लगाम लावने गरजेचे  आहे.

 

कारवाईचा फार्स फक्त 'मंथली'साठी 

गुटखा विक्री करणारे व कोल्हापूर,सांगली,बेळगाव येथून पोहोच करणारे सर्वचजण प्रशासनाला माहित आहेत परंतु मंथलीच्या घोळाने कानाडोळा केला जातो अशी  चर्चा आहे.चुकून कोणाला पकडले तर सर्वकाही ठरवून त्याची रीतसर केस दाखल करून सुटका केली जाते  परतू  'मी पुन्हा दर महिन्याला येईन' हा शब्द त्याच्याकडून घेतला जातो अशी 'त्या' गुटखा लॉबीत चर्चा असल्याची माहिती नागरिक देत आहेत.