उंब्रज येथे विजेचा लपंडाव सुरू

अर्ध्या तासाला बत्ती गुल व्हायचे प्रमाण वाढले,अधिकारी कोमात

उंब्रज येथे विजेचा लपंडाव सुरू

उंब्रज/प्रतिनिधी

चर्चेत असणारे उंब्रज ता.कराड येथील वीज वितरण कार्यालय ठेकेदारांची मर्जी सांभाळत असून सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडत असल्याच्या चर्चा आहेत.अर्ध्या अर्ध्या तासाला बत्ती गुल होत आहे.यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी तसेच वर्क फ्रॉम् होम करणारे माहिती तंत्रज्ञान विभागातील मुले मुली मेटाकुटीला आले आहेत.घरात इंटरनेट सुविधेसाठी ब्रॉडबँड घेतले आहे पण सतत बत्ती गुल होत असल्याने नाईलाजाने पुणे मुंबईत नोकरीच्या ठिकाणी पलायन करत आहेत.यामुळे नाहक भुर्दंड बसत असल्याच्या तक्रारी होत आहेत.तर महावितरचे कर्मचारी व अधिकारी भूलथापा मारून नागरीकांची बोळवण करण्यात व्यस्त आहेत.अशी तक्रार स्थानिक नागरिक करीत आहेत.

अचानक वीज प्रवाह बंद झाल्याने नागरिकांच्या विद्युत उपकरणात बिघाड निर्माण होत आहे.यामुळे नाहक खिशाला कात्री बसत असून वीजबील वसुलीसाठी गल्लोगल्ली फिरणारे कर्मचारी बत्ती गुल झाल्यावर संपर्कहीन होत आहेत आणि वीज वितरण कार्यालयातील दूरध्वनी सातत्याने आजारी असल्याने कधी उचलला जातो तर कधी उचलून बाजूला ठेवलेला असतो.यामुळे दिवसागणिक वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुलापती वाढतच आहेत. नियमाप्रमाणे वीज बिल भरले तरी हेळसांड सुरूच असल्याने नागरिकांचा वीज वितरच्या कामकाजा विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.सर्वांचीच परिस्थिती इन्व्हर्टर अथवा यूपीएस घेण्याची नसल्याने उंब्रज विभागातील वीज वितरण सुरळीत करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.