महामार्गावर उंब्रज परिसरात सोयीपेक्षा गैरसोयीच जास्त

भोसलेवाडी फाटा ते मसूर फाट्या पर्यंतची वाट देते मृत्यूला आमंत्रण ..!

महामार्गावर उंब्रज परिसरात सोयीपेक्षा गैरसोयीच जास्त
महामार्गावर उंब्रज परिसरात सोयीपेक्षा गैरसोयीच जास्त

महामार्गावर उंब्रज परिसरात सोयीपेक्षा गैरसोयीच जास्त

भोसलेवाडी फाटा ते मसूर फाट्या पर्यंतची वाट देते मृत्यूला आमंत्रण ..!

 

                                                                     उंब्रज ता.कराड येथील परिसरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी निर्माण झाल्याने या त्रुटींचा सामना मागील पंधरा  वर्षांपासून ग्रामस्थांना तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना करावा लागत आहे. रहदारीचे ठिकाण असतानाही उंब्रज येथे उड्डाणपूल होऊ शकलेला नाही. उड्डाण पुलाऐवजी ठेकेदारास मलाई मिळवून देणारे चार भराव पुल ते पण ठेकेदाराच्या सोयीने बनवण्यात आले. काम करताना येथील नागरीकांचा काडीमात्र विचार केला  गेला नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असुन सहज सुरक्षित प्रवास करण्याऐवजी रोज जीव मुठीत घेवून अपघाताच्या भीतीखाली नागरिकांना वावरावे लागते.कधी कोणता अपघात कसा होईल याचा नेम नाही.आजवर लोकांच्या डोळ्यादेखत अनेकांचे बळी गेले आहेत. सन २००४ सालापासून महामार्गावर कोर्टी  ते मसूर फाटा  या २ किलोमीटरच्या  अंतरामध्ये  प्रतिवर्षी  अनेक जणांंना अपघातात  जीव गमवावा लागला आहे. तर कितीतरी  लोक गंभीर रित्या जखमी होतात. ही अपघातांची मालिका आजपर्यंत सुरूच असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावरून लोकांना नाईलाजास्तव रस्ता क्रॉस करावा लागतो रस्ता क्रॉस करण्याशिवाय कोणताही सुरक्षित पर्याय नसल्याने लोकांचा हकनाक बळी दिला जात आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने रस्ता क्रॉस करु नये यासाठी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी बॅरिकेट्स उभारली आहेत. परंतु योग्य पर्याया अभावी प्रवासी बँरिगेटला वळसा घालुन, बँरिगेटवरुन उड्या टाकून ये जा करत आहेत.  त्यामुळे अपघातात अधिकची भर पडली आहे.  यासाठी सुरक्षित क्रॉसिंग होणे गरजेचे आहे.  पंरतू कायमस्वरूपी उपाययोजनांकडे संबंधित लक्ष देत नाहीत व तात्पुरत्या मलमपट्ट्या केल्या जातात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

     महामार्गावरील वेगाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही वाहने शंभर ते दीडशेच्या स्पीडच्या वेगाने महामार्गावरून धावत असतात. द्रुतगती मार्गाचा प्रवास चौपदरीकरणावरुन केला जातो त्यामुळे महामार्गालगतची सर्वच गावे असुरक्षित आहेत. उंब्रज हे परिसरातील जवळपास दिडशे गावांची बाजारपेठ आहे. त्यामुळे महामार्गावर सातत्याने लोकांची, प्रवाशांची रहदारी असते मात्र तरीही वेगाला येथे कोणतीही मर्यादा नसल्याने अपघात घडत आहेत. तारळी व उत्तर मांंड नदीच्या वळणावरून सुसाट वेगाने गाड्या धावतात व  क्षणार्धात उंब्रज पार करून पुढे जातात मात्र या वेगाने आजवर अनेकांचे बळी घेतले आहेत. 

   उंब्रज येथील प्रवाशांची सध्या फार मोठी गैरसोय म्हणजे सेवा रस्ते. महामार्गाच्या पुर्व पश्चिम  बाजूला झालेले सेवा रस्ते अरुंद आहेत.  या सेवा रस्त्यावरून अवजड वाहने यामध्ये एसटी ट्रक यासारखी वाहने प्रवास करु शकत नाहीत. याच कारणास्तव लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या महामार्गावरूनच पुढे जातात त्यामुळे उंब्रज बसस्थानकासमोर तसेच आयडीबीआय बँकेसमोर मोठ्या प्रमाणावर दिवसभर प्रवाशांची गर्दी एसटीच्या व इतर वाहनांच्या प्रतीक्षेत उभी असते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात सकाळच्यावेळी उंब्रज बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये ट्रॅव्हल्स घुसून दोन जणांना प्राणास मुकले लागले तर तिघेजण जायबंदी झाले आहेत. आजवर या परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघात घडले आहेत. मात्र तरीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जात नाही.  महामार्ग सायंकाळी सातनंतर अंधारात असतो त्यामुळे महामार्गावरून कोण येजा करते याचा थांगपत्ताही लागत नाही.  मोठी रहदारी असतानाही रात्रीच्या वेळी महामार्गावर काहीही दिसून येत नाही.  त्यामुळे अनेक अपघात व चित्र विचित्र प्रकार घडतात.महामार्ग बांधकामावेळी झालेल्या त्रुटींमुळे अपघात, वाहतुकीची कोंडी,  प्रवाशांना ये जा करताना होणारा त्रास,  असुरक्षित प्रवास व कायमस्वरूपी असलेली अपघाताची धोकादायक स्थिती अशा अनेक समस्या निर्माण झालेले आहे.  त्यामुळे उंब्रज येथील महामार्गाचे तातडीने रुंदीकरण व उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी  अनेक वेळा आंदोलने मोर्चे होऊनही  शासन दरबारी याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने नेमकी दाद मागायची कुणाकडे असा सवाल व्यक्त होत आहे. 

सद्यस्थितीत  येथील महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून दर महिन्याला एखाद दुसरा अपघात ठरलेला आहे.एस.टी गाड्या, खासगी प्रवाशी वाहणे, लांब पल्ल्यांच्या गाड्या व इतर वाहने  महामार्गावर थांबतात. या व्यतिरिक्त कुठेही थांबण्यास पर्याय नसल्याने ही परिस्थिती आहे. त्यांंमुळे अपघातांना मात्र निमंत्रण मिळत आहे.  उंब्रज हे रहदारीचे व ज्यादा लोकसंख्या असणारे ठिकाण असतानाही रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा केलेल्या नाहीत. त्याचाही फटका प्रवाशांना बसत आहे.  सेवा रस्त्यांवर सध्या वाहतुकीची कोंडी, अपघात,  वादावादी, पार्कीगची गैरसोय, स्वच्छतागृहांचा अभाव यासारख्या गैरसोयी आहेत. काही ठराविक एसटी बसेस बस स्थानकात येतात मात्र सेवा रस्ते अरुंद असल्याने या एसटी गाड्यांनाही बस स्थानकात येताना व बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.  अशा अनेक गंभीर समस्या महामार्गा बांधकामातील त्रुटींमुळे निर्माण झाल्या आहेत.  याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व रस्ते विकास महामंडळ लक्ष देणार की नाही असा सवाल व्यक्त होत असून वेळेत योग्य ती पावले न उचलली गेल्यास जनक्षोभाचा सामना संबंधितांना करावा लागेल यात शंका नाही.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा !

तासवडे ते उंब्रज दरम्यान सेवा रस्ता नसल्याने गेल्या १५  वर्षात दुचाकीस्वार व स्थानिक नागरिकांचे अनेक बळी हे निव्वळ रस्ते विकास महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे गेल्याची संतप्त भावना तासवडे,वराडे,शिवडे,येथील ग्रामस्थ व्यक्त करीत असतात सेवा रस्ते नसल्याने हॉटेलचालक बेकायदेशीर पार्किंग महामार्गावर करण्यास प्रवाशांना भरीस घालतात त्यामुळे अपघाताची शक्यता वाढीस लागते.या सर्वांसाठी रस्ते विकास महामंडळ जबाबदार असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.