उंब्रजकरांनी माणुसकी जोपासली

karad

उंब्रजकरांनी माणुसकी जोपासली
मदतकार्य राबवीत असताना सुधाकर जाधव व राजीव रावल मित्रपरिवार
उंब्रजकरांनी माणुसकी जोपासली

उंब्रजकरांनी माणुसकी जोपासली

उंब्रज/प्रतिनिधी

मसूर फाटा ते भोसलेवाडी फाटा या दोन किलोमीटरच्या दरम्यान कायमच लहान मोठे अपघात होत असतात.यामध्ये काहीजण गंभीर जखमी होतात तर काही कायमचे जीवाला मुकतात मात्र उंब्रज परिसरातील नागरिक कायमच मदतीच्या भावनेने संकटकाळी धावून येतात हा आज पर्यंतचा अनुभव शनिवारच्या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले  आहे.यामध्ये रोटरी क्लब,विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच तरुणाई व आबालवृद्ध असे सर्वच जण मदतकार्यासाठी जीव तोडून मदत करतात हा उंब्रजचा इतिहास आहे.

शनिवारी दीपावलीच्या पहाटे तारळी पुलाजवळ झालेला अपघात आणि नागरिकांनी केलेली मदत खरच बहुमोल आहे.निस्वार्थी भावनेने तातडीने राबविलेले मदतकार्य जखमीना जीवदान देऊन गेले आहे.परंतु नित्यनेमाने होणारे अपघात आणि रस्ते विकास महामंडळ यांची भूमिका ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.चार पदरी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट ऍग्रिमेंट करताना ठरलेल्या नियमाप्रमाणे बहुतांश काम झाले नसल्याची जनतेची ओरड आहे यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात असून टोल वसुली पुरतेच लक्ष दिले जात असल्याची जनता व प्रवाशांची तक्रार आहे.

मांड नदी व तारळी नदी या दोन्ही ठिकाणचे वळण रस्ते धोकादायक असून भोसलेवाडी फाटा ते उंब्रज बाजूचा तारळी नदीचा कॉर्नर हा धोकादायक टप्पा म्हणून गावात परिचित आहे.तारळी पुलावर दोन्ही बाजूला आठवड्यात एखादा अपघात ठरलेला असून यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.लॉक डाऊन च्या काळात डॉक्टर पत्नी व इंजिनिअर पती यांची कार उलटून दोघेही जागीच ठार झाल्याची घटना ऑगस्ट मध्ये घडली होती.काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील युवक ट्रकच्या धडकेत जागीच गतप्राण झाला होता.माणसं जीवानिशी जात असतील आणि रस्ते विकास महामंडळ सोयीसुविधा देताना कमी पडत असेल तर सर्वसामान्य माणसांनी टोल कशासाठी द्यायचा असा सवाल निर्माण झाला आहे.

महामार्ग पोलीस कशासाठी ?

महामार्गाचे विस्तीर्ण जाळे महाराष्ट्रात असल्याने राज्य सरकारने यासाठी एक स्पेशल फोर्स तयार केले असून यांचे काम महामार्गावरून वाहतूक सुरळीत ठेवणेच कार्य पार पाडले जाते.परंतु आडबाजूला बसून स्पीड गण लावणे,लायसन्स कागदपत्रे तपासणी करणे असे वरकमाईचे उदयोग वाढले असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांच्यात चर्चा आहे.या पथकाच्या दिमतीला आलिशान सर्वसोयीनियुक्त वाहन असल्याने थंडगार वाऱ्यात अधिकारी रस्त्यावर उभे राहताना हयगय करत असल्याची चर्चा आहे.

टोलनाके फक्त वसुलीसाठी !

महामार्गावर असणारे टोल नाके हे फक्त वसुलीसाठीच आहेत काय अशी कुजबुज नागरिकांच्यात असून ओव्हरलोड वाहनांसाठी वजनकाटे तात्काळ उभं राहतात मात्र रस्तावर सोयी सुविधा देताना यांची दातखीळ बसत असल्याची नागरिकांची चर्चा आहे.प्रवासी वाहनांच्या चालकांना अरेरावी करण्यात पटाईत असणारे टोल प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळताना मूग गिळून गप्प बसत आहे.

भोसलेवाडी व कोर्टी च्या नागरिकांची हेळसांड

उंब्रज ते भोसलेवाडी दरम्यान जोडणारा पूल असल्याने नागरिक पुलावरून उलट दिशेने प्रवास करीत असतात यामुळे बऱ्याच वेळेला गंभीर अपघात होऊन ग्रामस्थ दगवल्याच्या घटना घडल्या असून भोसलेवाडी येथील पुलाखाली चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना उलट दिशेने प्रवास करावा लागत असल्याची चर्चा आहे.