वर्दीतील दर्दी सपोनि अजय गोरड

पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर 

वर्दीतील दर्दी सपोनि अजय गोरड

उंब्रज / प्रतिनिधी


उंब्रज ता.कराड येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अजय गोरड यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भामरागड,जि.गडचिरोली, तसेच पोलीस स्टेशन यवत,बारामती, नारायणगाव जि.पुणे ग्रामीण येथे व  पोलीस स्टेशन उंब्रज जि.सातारा येथे केलेल्या चांगल्या,उल्लेखनीय व समाजाभिमुख तसेच गुन्हेगारविरुध्द केलेल्या प्रशंसनीय व अत्युत्तम कामगिरी बद्दल सपोनि अजय गोरड यांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे.यासाठी उंब्रजसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उंब्रज पोलिस स्टेशनच्या इतिहासात सर्वात प्रभावी काम करणारे पोलीस अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांचे नाव पुढे आले आहे. नुकतेच मसूर येथील चार जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यासह लगतच्या कडेगाव, शिराळा तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केल्यानंतर  उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६० जणांविरुद्ध तडीपारीची अर्धशतकी कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. उंब्रज पोलीस स्टेशनच्या इतिहासातील हा एक अनोखा विक्रम अधोरेखित झाला आहे. 


 सातारा जिल्ह्यात संवेदनशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंब्रज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. कराड तालुक्यातील मसूर आणि पाटण तालुक्यातील तारळे दूरक्षेत्रातील सुमारे शंभरच्या आसपास गावांचा डोलारा आहे. मात्र उशाला केवळ ४८ पोलिसांचा फौजफाटा अशी परिस्थिती आहे. तरीही तोकड्या मनुष्यबळाच्या जीवावर तारेवरची कसरत करीत उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखली आहे.


कराड, पाटण तालुक्यातील  तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पोलिस, महसूल, आरोग्य प्रशासन यांच्यासह विविध संघटना यांच्याशी सुसंवाद साधत पोलीस ठाण्याचा कारभार चालवणे आजपर्यंत उंब्रज पोलीस स्टेशनच्या अनेक अधिकाऱ्यांसाठी तारेवरची कसरत ठरली आहे. मात्र, सपोनि अजय गोरड यांनी हा शिवधनुष्य सक्षमपणे पेलल्याचे त्याच्या कामगिरी वरुन स्पष्ट आहे.

गोरड यांनी ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून पोलिसांना नेमून दिलेल्या कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक सलोखा जपण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या विभागात शांतता व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबत गावागावात ग्रामसुरक्षा दल स्थापन केली. प्रत्येक गाव तेथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी पुढाकार घेतला.


 तडीपरीच्या प्रस्तावाबाबत उंब्रज पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ चे १६ प्रस्ताव पाठवले. त्यापैकी १४ मंजुर.महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ चे ११ प्रस्ताव पाठवले त्यापैकी ५ मंजूर.उर्वरीत प्रस्ताव सुनावणी प्रकियेत.असून उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील आतापर्यंत एकूण ६० जण तडीपार तसेच ७ प्रस्ताव मधील १० इसमांवर सुनावणी प्रकियेत

     

उंब्रजसह परिसरातील जनतेने दिलेल्या सहकार्याने कायदा सुव्यवस्था राबविताना अतिशय मदत झाली,उंब्रज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांची प्रचंड दहशत होती. याबाबत मा. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजमधील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर कारवाई करत उंब्रज विभाग दहशत मुक्त करण्यात आम्हाला यश आले आहे. भविष्यातही गुन्हेगार प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.हद्दीतील सर्वांकडे माझा मोबाईल नंबर असल्याने एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.


अजय गोरड,

सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज