उंब्रजसह शिवड्याच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा

माहिती अधिकार अर्ज काढून घेण्यासाठी मागितली होती खंडणी ; एक लाखाची केली होती मागणी,तक्रारदाराचा रेकॉर्डिंग असणारा पेनड्राइव्ह पोलखोल करणार

उंब्रजसह शिवड्याच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा

कराड  / प्रतिनिधी 

माहिती अधिकार कायद्याच्या वापर करून अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन १ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कराड तालुक्यातील उंब्रजसह शिवडे येथील दोघा जणांवर  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सोमवार दिनांक ६ मार्च रोजी उंब्रज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

     महेश उर्फ बंडा यशवंत काशिद रा.उंब्रज तालुका कराड व विजय जयवंत कुंभार रा.शिवडे तालुका कराड अशी खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

      याबाबत संपत राघू घाडगे वय ५८, रा.शिवडे तालुका कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  फिर्यादी घाडगे यांचे गावात रेशनिंग दुकान आहे. या दुकानची दिनांक १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२२ या चार वर्षाची माहिती मागविण्यासाठी संशयित काशिद याने माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. 

माहिती मागवून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार कोणासोबत घडला असेल तर त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी तसेच अशा प्रकारे या अगोदर जोर जबरदस्ती करून पैसे उकळले असल्यास निःसंकोचपणे उंब्रज पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे

अजय गोरड 
सपोनि उंब्रज पोलीस ठाणे


या संपूर्ण माहितीच्या झेरॉक्स साठी सुमारे दहा हजार रुपये भरावे लागतील असे पत्र पुरवठा विभागाने काशिद याला पाठविले होते. मात्र संशयित काशिद याने सदरचे दप्तर समक्ष पहावयाचे असल्याचा अर्ज पुरवठा विभागाला केला होता. या अनुषंगाने पुरवठा विभागाने दप्तर पाहण्यासाठी सोमवार दिनांक ६ मार्च ही तारीख कळविली होती.

 

यावेळी फिर्यादी घाडगे यांचे फोन संशयित काशिद हा उचलत नव्हता. यादरम्यान, गावातील संशयित कुंभार याला मध्यस्थी करून हॉटेल परख या ठिकाणी फिर्यादी घाडगे व संशयित काशीद भेटले या दरम्यान, संशयित काशीद याने  फिर्यादी घाडगे उदयनमहाराज यांच्याशी वडोलीतील वाळुच्या ठिय्याची माहिती अधिकारात माहिती मागवुन त्या बदल्यात माझी ४ पोरं वाळूच्या ठिय्यात घ्यायला भाग पाडली, कोविङ काळातील १३ बेड संबंधात माहिती मुद्दा उपस्थित करुन आमदारांना कसे वाकविले, माजी आमदार विलासकाकांचा पोरगा उदयसिंहला खरेदी विक्री संघाची माहिती मागवुन कसे वाकविले असे सांगून  शरद शहाला विचार त्याचे माहिती अधिकार अर्ज प्रकरण कसे मिटविले असे सांगत शहा कडुन प्रकरण मागे घ्यायला एक लाख रुपये घेतले नंतरच ते प्रकरण मिटविले असल्याचे  संशयित काशिद याने फिर्यादी यांना सांगितले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान,संशयित काशीद याने रेशनिंग दुकानदार यांना माहिती अधिकार अर्ज काढून घेण्यासाठी १ लाख रूपयांची मागणी केली यावेळी फिर्यादी यांनी माझी परिस्थिती नसल्याने तडजोडी अंती ५० हजार रुपये देण्याचे कबूल त्यापैकी दि. ५ मार्च रोजी ५ हजार रुपयांची रक्कम संशयित कुंभार याच्याकडे देण्यात आली. या दरम्यान, संशयित काशीद व कुंभार तसेच उंब्रज येथील अजून एक इसम हॉटेल साईनाथ मध्ये होते. यावेळी जेवन देण्यास भाग पाडले व जेवन झाल्यावर ठरलेल्या रकमेपैकी उर्वरित रक्कम दि. ६ मार्च पर्यंत न दिल्यास तुला जिवंत ठेवणार नाही. तसेच या प्रकरणात  पैसे द्यावेच लागतील नाहीतर तुमचे काही खरं नाही. माझ्याशी गद्दारी केली, ही माहिती कुणाला देण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारीन तुमचे आणि तुमच्या कुटूंबाचे जीवन उध्दवस्त करीन रेशन दुकान संपवेन अशी दमदाटी केली. असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून उंब्रज पोलीस ठाण्यात दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक महेश पाटील करत आहेत.