तहसीलदार आले अन चक्कर मारून गेले..

मोकाट वाळू ठेकेदारांवर कोणाचाच अंकुश नाही, साहेबांचा दौरा ठरलाय चर्चेचा विषय

तहसीलदार आले अन चक्कर मारून गेले..

उंब्रज/प्रतिनिधी

दै 'प्रीतिसंगमने' उंब्रज परिसरातील बिनबोभाटपणे चाललेला अवैध वाळू उपशाचा भोंगळा कारभार उजेडात आणताच कराडचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी या बातमीची दखल घेऊन  तहसिलदारांसह महसूल विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसिलदार आपल्या पथकासह उंब्रज परिसरात आले आणि वरवरची पाहणी करुन निघूनही गेले. मात्र उंब्रज परिसरातील अवैध वाळू उपशावर काय कारवाई केली हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याने महसूल विभागाच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

उंब्रज परिसरात बिनबोभाटपणे सुरु असलेल्या वाळू उपशामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलाला चुना लागत होता. दै.प्रीतिसंगम ने याबाबतची वस्तुस्थिती मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले असता प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली.आणि संबंधितांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर गुरुवारी 
दुपारच्या सुमारास तहसिलदार अमरदीप वाकडे हे काही आपल्या सहकार्यांसोबत वाळू उपसा केला जातो त्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी रवाना झाले. यावेळी सोबत विभागातील तलाठी व मंडल अधिकरी होते. उत्तरमांड, तारळी व कृष्णा नदी पात्रात महसूल विभागातील काहींच्या वरदहस्तामुळे चालणाऱ्या अवैध वाळू उपशाची माहिती घेण्यासाठी तहसीलदार वाकडे यांना स्वत: यावे लागत असेल तर स्थानिक महसूल यंत्रणा नेमकी काय करते याबाबत लोकांच्यात उलटसुलट चर्चा आहे.
तहसीलदारांनी दौर्‍या दरम्यान कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या आणि नक्की काय माहिती मिळाली आणि त्यानंतर काय कारवाई केली याबाबत अद्यापही गोपनीयता असल्याने तहसीलदारांचा त्यावेळचा दौरा उंब्रज परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

परिसरातील उत्तरमांड नदीपात्राकडे  तसेच खालकरवाडी परिसराकडे तहसीलदार यांच्या गाड्यांचा ताफा गेल्याची चर्चा त्यादिवशी दिवसभर लोकांच्यात होती. वाळू उपसा करणारांची इतंभूत माहिती मिळाल्याची बाब काहींनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगीतली, मात्र तहसीलदारांच्या पाहणीनंतरही संबंधित वाळू ठेकेदारांवर प्रशासनाकडून कसलीच ठोस कारवाई झाली नसल्याने व हे वाळू ठेकेदार अद्यापही मोकाट फिरत असल्याने तहसीलदारांचा 'कारवाई दौरा' केवळ 'फार्स' असल्याचे बोलले जात आहे. उंब्रज परिसरातील अवैध वाळू उपशावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिणामी महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून तो परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. उंब्रज परिसरात सातत्याने चालणारा अवैध वाळू उपसा सर्वसामान्यांना दिसतो मग संबंधित प्रशासनाला का दिसत नाही.


कारवाई नेहमी गुलदस्त्यातच का ?

महसुलच्या कारवाया नेहमी गुलदस्त्यातच राहत असल्याने नेमका काय सावळागोंधळ झाला हे जनतेपर्यंत कधीच येत नाही,माहिती साठी महसूल कर्मचाऱ्यांना फोन केला असता नेहमी टंगळमंगळ केली जाते.वाळू उपशाबाबत खरी माहिती लपवली जात असल्याची चर्चा जनतेत आहे.यामुळे महसुलच्या कारवाया नेहमी गुलदस्त्यातच का? याबाबत जनतेत उलटसुलट चर्चा आहे.

दौऱ्या नंतरही वाळू उपसा सुरूच

गुरुवारी झालेल्या तहसीलदाराच्या दौऱ्यानंतर उंब्रज परिसरातील अवैध वाळू उपश्याला आळा बसेल अशी सर्वसामान्यांना लोकांची अपेक्षा होती.मात्र तहसीलदारांच्या दौऱ्यानंतरही उंब्रज येथील अवैध वाळू उपसा करणारे ठेकेदारांनी तहसीलदार यांच्या दौऱ्याला न जुमानता भरदिवसा वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला आहे.यातून वाळूठेकेदारांची वाढती शिरजोरी आणि महसूल विभागाचा निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.प्रांत साहेब इकडे लक्ष देतील काय याकडे आता परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.या अवैध वाळू उपशातून अनेकांनी लाखोंची माया जमवली असल्याने ते पुन्हा वाळू चोरी करण्यासाठी सक्रिय झाल्याने त्यांचे धाडस सर्वसामान्य जनतेला अवाक करणारे ठरत आहे.