शिवडे गावच्या हद्दीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना घडली दुर्घटना

शिवडे गावच्या हद्दीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

उंब्रज / प्रतिनिधी 

पाईप वेल्डींग व ब्रॅन्डींगचे काम खड्ड्यात उतरुन सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा पडून दबून दोघां जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.४ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.ही घटना राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शिवडे गावच्या हद्दीत गॅस पाईप लाईनचे काम करताना घडली आहे.


साहिल कुमार ओमकार चाँद (वय२६) रा. पठाणकोट, पंजाब,सुखेदु बिकास बेरा (वय२२) रा. वेस्ट बंगाल अशी जागीच ठार झालेल्या कर्मचा-यांची नांवे आहेत.


याबाबत अमित कुमार बीपीन कुमार सराय, ता. पटना, बिहार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या एका हॉटेल शेजारी एसीई  पाईप लाईन क्रॉन्ट्रक्ट प्रा. लिमिटेड या कंपणीचे पाईप वेल्डींग व ब्रॅन्डींगचे काम कंपणीचे पाईप वेल्डींगचे काम चालु होते. यावेळी सात जण काम करीत होते. त्यापैकी दोन कामगार एका बाजुस व दुसरे पाच कामगार एका बाजुस असे काम करीत होते. या दरम्यान, त्यावेळेस साहिल कुमार चाँद व सुखेदु बिकास बेरा हे दोघे एका  पाईप लाईनच्या खड्ड्यात वेल्डींगचे काम करीत होते.त्यावेळेस अचानक खड्ड्यासाठी काढलेला मातीचा ढिग घसरुन दोघा जणांच्या अंगावर पडला यामध्ये मातीच्या ढिगा-याखाली दबले गेले. दोघा जखमींना बाहेर काढून घटनास्थळी धाव घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले.या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाले आहे तपास पोलीस करत आहेत.

महामार्गालगत गॅस पाईपलाईनच्या कामात सुरक्षा कमी धोका जास्त

गेली वर्षभर सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम अनेक ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याने चर्चेचा विषय ठरले आहेत.रात्री अपरात्री काम सुरू ठेवणे,दिशा दर्शक फलक न लावणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे अशा बाबी नित्याचाच झाल्या असून दोन तरुण युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.