सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने उंब्रजकर त्रस्त

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाची गरज

सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने उंब्रजकर त्रस्त
सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने उंब्रजकर त्रस्त

सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने उंब्रजकर त्रस्त

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाची गरज

उंब्रज/प्रतिनिधी

सात महिन्यांच्या कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दीपावलीच्या पार्श्वभूमीवर उंब्रज बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडू लागली आहे.किराणा बाजार तसेच कपडेलत्ते घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढत असून उंब्रज येथील सेवा रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीने नागरिक मात्र त्रस्त होत आहेत.यासाठी जालीम उपाययोजना कोणाकडेही नसल्याने चाफळ फाटा ते चोरे रोड हे नाममात्र अंतर कापण्यासाठी बराच वेळ मुंगीच्या वेगाने वाहने अंतर कापत आहेत.परंतु पोलीस क्रेन मात्र मोक्याच्या ठिकाणी सावज शोधत उभी असल्याने नागरिकांना  मनस्ताप भोगावा लागत आहे.

सेवा रस्त्याकडेला थाटलेली दुकाने,पार्किंगचा उडालेला बोजवारा आणि नागरिकांना उलट मार्गावर प्रवास करायची लागलेली सवय तसेच ऊस वाहतुकीची वाहने,एस टी बसेस आणि खरेदीसाठी रस्त्यात पार्क केलेली वाहने यामुळे चाफळ फाटा ते चोरे रोड दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या ही नित्यनेमाची झाली आहे.आणि पर्यायाने मग लहान मोठे अपघात होण्याचा धोका संभवत असल्याने उंब्रज पोलिसांनी सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी प्रवासी नागरिकांच्यातून होत आहे.

बसस्थानक अथवा पोलीस ग्राऊंडवर पार्किंग करावे

उंब्रज मधील दुकानगाळे धारकांनी आपली दुकाने उभी करत असताना पार्किंगचा अजिबात विचार केलेला नाही ज्या दुकानगाळे धारकांचे स्वतःचे पार्किंग नाही त्यांना विविध कामासाठी लागणारे व्यवसाय दाखले ग्रामपंचायतीने देऊ नयेत व पोलीस ग्राउंड व बसस्थानकासमोर असणारे मोकळे मैदान पे अँड पार्क साठी वापरण्यात यावे यामुळे वाहन चोरी कमी होऊन रस्ते मोकळे श्वास घेतील तसेच संबंधित विभागांना महसूल सुद्धा प्राप्त होईल.

ठराविक वेळेत 'नो एंट्री' 'वन-वे' चे धोरण महत्वाचे

दोन्ही सेवा रस्त्यांवर गर्दीचा सर्व्हे करून कोणत्या वेळेत जास्त गर्दी होत आहे याचे निरीक्षण करून त्या वेळेला वन- वे अथवा नो एंट्री सारखे धोरण अवलंबले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल यामुळे वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होऊन मार्गक्रमण करणे सुखर होईल.

चोरे रोड डेंजर कॉर्नर

सेवा रस्यावरून मार्गक्रमण करणारी ऊस वाहतुकीची वाहने ही अतिशय धोकादायक परिस्थितीत येत जात असतात  शिग लावून भरलेला ऊस आणि चोरे रोडचा धोकादायक व वर्दळीचा कॉर्नर यामुळे दुर्दैवाने कधी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? हा कळीचा मुद्दा असून चाफळ फाटा ते सैनिक बँकेसमोर चढ असून पुढे उतार असल्याने ट्रॅक्टर चालकाला कसरत करावी लागत आहे. कॉलेज रोड ,चाफळ रोड, चोरे रोड याठिकाणी भुयारी मार्ग आहेत त्यातच रस्त्यावर चारचाकी वाहनांचे पार्किंग यासाठी पोलीस प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.मसूर रोड अथवा चाफळ रोड अशा आडबाजूला वाहतूक पोलीस उभे करून काहीही साध्य होणार नसल्याची लोकांच्यात चर्चा आहे.