कोरोनाच्या काळातही रेशनिंग दुकानदारांना पावतीचे वावडे

पावती नसल्याने ग्राहकांची  होतेय फसवणूक, दुकानदारांवर कोणाचाचअंकुश नाही, पालकमंत्र्यांसह, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

कोरोनाच्या काळातही रेशनिंग दुकानदारांना पावतीचे वावडे

उंब्रज/प्रतिनिधी: 


संपूर्ण जगाला कोरोना आजाराने हैराण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रशासनाने ता. १ एप्रिलपासून रेशनिंग दुकानातून वाॅर्डनिहाय धान्य वाटप करण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र कर्‍हाड तालुक्यातील वहागावसह अनेक गावांत ग्राहकांना धान्य खरेदीनंतर कसलीच पावती दिली जात नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक पुरतेच हैराण झाले आहेत. संबंधित दुकानदार ग्राहकांना धान्य कमी देऊन पैसे मात्र ज्यादा उकळत असल्याची ग्राहकांची तक्रार असून दुकानदारांकडून होणाऱ्या सर्रास लूटमारीवर कोणाचेच कसलेही नियंत्रण नसल्याची प्रचिती ग्राहकांना येत आहे. 

संपूर्ण जगाला कोरोना आजाराने हैराण केले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन तातडीने विविध निर्णय घेताना दिसत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रशासनाने ता. १ एप्रिलपासून रेशनिंग दुकानातून वाॅर्डनिहाय धान्य वाटप करण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र स्वस्त धान्य दुकानातून वारेमाप पैसे कमावण्यात पटाईत असणाऱ्या धान्य दुकानदारांनी ग्राहकाला धान्य वितरणानंतर शासन नियमानुसार पावती देणे बंधनकारक असतानाही ते सध्या नेहमीप्रमाणेच धान्य वितरणानंतर ग्राहकांना कसलीही पावती न देता शासनाची दिशाभूल करुन आपला वरकमाईचा धंदा बिनबोभाटपणे करीत आहेत. वहागावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत संबंधितांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून कसलीच दखल घेतली जात नसल्याची प्रचिती ग्राहकांना येत आहे. परिणामी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार ग्रामस्थांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे. 

वहागाव येथील दुकानदाराच्या कारनाम्यावर तर दुकानाचा परवाना रद्द करण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव २६ जानेवारीच्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर झाला. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यावरील पुढील निर्णयही शासनाकडून प्रलंबित राहिला. मात्र सध्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संबंधित दुकानदार गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून ग्राहकांना शासन नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता व त्याची कसलीही पावती न देता धान्य कमी देऊन ज्यादा पैसे घेत आहे. तसेच खोटी कारणे सांगून वहीत कोर्‍या पानांवर सह्या घेत आहे, तसेच ग्राहकांशी उध्दटपणे वागून दुकान आवारात दहशत करुन ग्राहकांना दमदाटी करीत आहे, त्याबाबत तसा तक्रार अर्जही तळबीड पोलिसांत गुरुवारी (ता. २) दाखल झाला आहे. दुकानदाराच्या मनमानी कारभाराला स्थानिक प्रशासनाकडून मिळणारे पाठबळ सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. 

दरम्यान सध्या ग्राहकांनी संबंधित दुकानदारास धान्याच्या पावती बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन पावती देणे टाळले जात असल्याचा प्रकार येथे राजरोसपणे घडत आहे. गुरुवारी (ता.२) पावती बाबत विचारणा केलेल्या ग्राहकास दुकानदारासह, साथीदारांकडून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तळबीड पोलिसांत ग्राहकाने तशी तक्रारही दाखल केली आहे. ग्राहकांची मुस्कटदाबी करुन त्यांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या संबंधित दुकानदारावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 


-----------------

 

 

कारवाईला मिळेना मुहूर्त... 

वहागावच्या ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदाराच्या कारनाम्याबाबत सबळ पुरावेही कर्‍हाड चे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह पुरवठा विभागाच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडे यापूर्वी दिले आहेत. सबळ पुरावे देऊनही संबंधितांकडून त्यावर कसलीच कारवाई होत नसल्याने व दुकानदाराची शिरजोरी वाढत चालल्याने ग्राहकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत चालला आहे. संबंधित प्रशासनाकडून दुकानदारावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने पुरवठा विभागाचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. 


-------------------

 


वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराबाबत स्थानिक प्रशासनासह संबंधितांकडे वारंवार याबाबत पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र संबंधिताकडून त्यावर कारवाई होत नाही. गावपुढार्यांसह, प्रशासनाच्या वरदहस्तामुळे दुकानदाराची शिरजोरी वाढली असून परिणामी ग्रामस्थांची फसवणूक होऊन मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी. 


- मनोज पवार (ग्रामस्थ, वहागाव) 


--------------------------

 

 

अद्यापही अनेक जण योजनेपासून वंचित 

वहागावसह परिसरात अद्यापही शासनाच्या स्वस्त धान्य योजनेपासून अनेक जण वंचित आहेत. दुकानदारासह संबंधित पुरवठा विभागाकडे वारंवार कागदपत्रे देऊनही त्यांना अद्यापही शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळत नाही. जिल्हा पुरवठा विभागाने वहागाव येथील उर्वरित ग्रामस्थांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी योग्य ती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 
--------------