व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावल्यास प्रांताधिकार्यांना जबाबदार धरू

व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावल्यास प्रांताधिकार्यांना जबाबदार धरू
प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देताना प्रमोद पाटील व इतर

दक्ष कराडकर ग्रुपच्यावतीने प्रांताधिकार्यांना निवेदनाद्वारे इशारा : उपाययोजना कमी पडत असल्याचाही केला आरोप 

कराड/प्रतिनिधी :
          शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, येथील कोविड हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. अशातच याठिकाणी उपचारासाठी तालुक्याव्यतिरिक्त बाहेरूनही बाधित रुग्ण दाखल होत आहेत. यामुळे येथील रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने गेल्या 10 दिवसात शहरातील  6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर असून जर यापुढे व्हेंटिलेटरअभावी एकाजरी रुग्णाच्या जीवितास काही झाले, तर याबाबत आपणास जबाबदार धरू, असा इशारा दक्ष कराडकर ग्रुपच्यावतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
         शहरातील 6 कोरोना रुग्णांचा वेळेवर व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्ण व नातेवाईकांच्या होणाऱ्या गैरसोईबाबतची वेळीच दखल घेण्यात यावी, व व्हेंटिलेटरची संख्याही वाढवण्यात यावी, यासंदर्भात गुरुवारी 6 रोजी दुपारी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना दक्ष कराडकर ग्रुपच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, जाबीर वाईकर, अजित पाटील, साबीरमिया मुल्ला, फिरोज मुल्ला उपस्थित होते.