येणकेत एक बिबट्या सापळ्यात कैद, तर दुसऱ्याचे दर्शन

येणके ता. कराड येथील एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात कैद झाला आहे. सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नांनंतर वनविभागाला हे यश मिळाले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरात येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

येणकेत एक बिबट्या सापळ्यात कैद, तर दुसऱ्याचे दर्शन

येणकेत एक बिबट्या सापळ्यात कैद, तर दुसऱ्याचे दर्शन 

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम : आठवडाभराच्या प्रयत्नानंतर एका बिबट्याला कैद करण्यात वनविभागाला यश 

कराड/प्रतिनिधी : 
 
          येणके ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. 

         दरम्यान, वनविभागाच्या पथकाकडून सदर विभागातील वनपरिक्षेत्राची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार वनविभागाने येणके परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे तीन ते चार सापळे लावण्यात आले होते. अखेर शनिवारी 26 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या सापळ्यात एक बिबट्या कैद झाला आहे. तत्पूर्वी रविवारी 27 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास परिसरात लावलेल्या सापळ्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यातील एका सापळ्यात बिबट्याचा एक बछडा कैद झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या बाबतची माहिती तात्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

         तत्पूर्वी, वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या कैद झल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने तात्काळ सापळ्यात कैद झालेल्या बिबट्याला ताब्यात घेऊन अन्यत्र हलवले आहे. सापळ्यात कैद झालेला बिबट्याचा बछडा असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली असून सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या या मोहिमेला यश आले आहे. 

         मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येणके गावमध्येच ग्रामस्थांना दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. येथील येणके-किरपे रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीजवळ शेतात काम करण्यासाठी निघालेल्या शेतकरी, युवकांना हा बिबट्या दिसला. त्यामुळे एकीकडे वनविभागाने एका बिबट्याला कैद केल्याचे ग्रामस्थांमध्ये समाधान असतानाच दुसरीकडे त्यात गावात अन्य एका बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले आहे. 

         तालुक्यातील सुपने, तांबवे पाठरवाडी, येणके परिसरात सुमारे तीन ते चार बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. तसेच या भागात  बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते. तर शेतात काम करणाऱ्या महिलेसह दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या युवकावरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. 

        त्यातच 15 (सोमवार) नोव्हेंबर रोजी येणके येथे ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर येणके व परिसरातील ग्रामस्थांमधून वनविभागाच्या ढिलाईबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांनीही बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मागणी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार वनविभागाने लावलेल्या तीन ते चार सापळ्यां मध्ये अखेर एक बिबट्या कैद झाला आहे. 

        दरम्यान, वनविभागाच्या या कारवाईवर परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, सुमारे तासाभरातच गावामध्ये दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले आहे. तसेच वनविभागाने कैद केलेल्या बिबट्याव्यतिरिक्त आज दिसलेल्या दुसऱ्या बिबट्यासह परिसरात अन्य दोन बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक लोकांना बिबटया आढळून आला आहे. त्यामुळे त्यांचाही वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.