कोयना धरणग्रस्तांना टेंभु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीनी मिळणार

 कोयना धरणग्रस्तांना टेंभु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीनी मिळणार
डॉ. भारत पाटणकर

 

पाटण/ प्रतिनिधी 

 कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या परिपूर्तीचा टप्पा आता सुरू झाला असून कोयना धरणग्रस्तांना सांगली जिल्ह्यातील टेंभु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीनी देण्यात येत आहेत. त्यासाठी ज्या धरणग्रस्तांना अजिबात पर्यायी जमीन अद्याप वाटप झालेले नाही त्यांना प्राधान्याने जमीन वाटप करण्यात येणार असून त्यासाठी संबधित खातेदारांच्या याद्या बनविण्यात येत असून १५ जुलै पर्यंत जमीन वाटपासाठी याद्या पुर्ण होतील. अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकाद्वारे  दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, टेंभुच्या लाभक्षेत्रातील जमीनी कोयना धरणग्रस्तांना द्यायचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला होता. या पार्श्वभूमीवर ४ जुलैच्या बैठकीत सांगली जिल्हाधिकारी यांचे सोबत होणार्‍या बैठकीत जमीन पसंतीचा कार्यक्रम ठरणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष धरणग्रस्तांच्या गाव कमिटी यांच्यामार्फत जमीन पसंतीची तारखेची मागणी करणार असून सर्व गावकमेटींच्या जमीन मागण्यांचे अर्ज व पत्र ४ जुलैच्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठकीत देण्यात येणार आहेत. ज्या खातेदारांना अजिबातच जमीनी देण्यात आल्या नाहीत त्या खातेदारांना अगोदर प्राधान्याने जमीनी देण्यात येत आहेत. ज्या कोयना धरणाच्या पाण्यामुळे बागायती जमीनी झाल्या आहेत, त्याच पाण्याने भिजणारी जमीन देण्यात येत आहे. कोयना धरणग्रस्तांचे प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या सोबत पहिली व दुसरी बैठक झाली होती. त्यानुसार मागण्यांच्या अंमलबजावणीचा पूर्तीचा कार्यक्रम सुरू होत आहे.

श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर २३ जानेवारी २०१८ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये हजारो धरणग्रस्त सामिल झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१८ ते २०  मार्च २०१८ दरम्यान कोयनानगर येथे २३ दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याअनुषंगाने १९ मार्च २०१८ रोजी  श्रमिक मुक्ती दलाने उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत पहिली बैठक झाली. त्यामध्ये सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याने २० मार्चला आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यांतर काही नवीन मुद्यांवर व मंजूर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी २ आक्टोंबर २०१८ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. नंतर परिपूर्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील निर्णायक ठिय्या आंदोलन १२ फेब्रुवारी २०१९ पासुन तब्बल ४१ दिवस कोयनेत करण्यात आले. त्याअनुषंगाने २० मार्च २०१९ रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होऊन त्यामध्ये अंमलबजावणी बाबत व काही नवीन मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे २१ मार्च २०१९ रोजी ४१ व्या दिवशी आंदोलन स्थगित करण्यात आले होते.