दक्षिण मांड नदीला महापूर

दक्षिण मांड नदीला महापुर

कराड/प्रतिनिधी :

             दोन-चार दिवसांपासून काले, ओंड, उंडाळे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. तसेच या परिसरामधील डोंगर, शेतशिवारातील पाण्यामुळे ओढे, नालेही ओसंडून वाहत आहेत. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी सकाळपासून या भागात अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाल्याने येथील दक्षिण मांड नदीला महापुर आला आहे. या पुरामुळे काले-संजयनगरचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

             ताकुक्यात पश्चिमेकडील डोंगरी भागात उगम पावणारी दक्षिण मांड नदी मोसमी स्वरुपाची असून या नदीला स्व:तचा असा जलस्त्रोत नाही. मात्र, या नदीत शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेतून कराड तालुक्यातील डोंगरी भागासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे ही नदी बारमाही वाहणार आहे. त्यामुळे येणपे, उंडाळे, ओंड येथील 2200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्या असून या भागातील कोरडवाहू जमिनींच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

            परंतु, सध्या तालुक्यासह दक्षिण मांड नदीच्या पाणलोट क्षेत्रात आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यातच दोन-चार दिवसांपासून येणपे, उंडाळे, ओंड या डोगरी भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने नदीवरील येणपे, घोगाव, उंडाळे, नांदगाव, काले-जुजारवाडी हे बंघारे ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच या परिसरामधील डोंगर, शेतशिवारातील पाण्यामुळे ओढे, नालेही ओसंडून वाहत असून शुक्रवारी मध्यरात्रीसह शनिवारी पहाटेपासून या भागात अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यात प्रचंड वाढ होऊन शनिवारी सकाळी दक्षिण मांड नदीला महापुर आला. त्यामुळे येथील काले-संजयनगर दरम्यानचा पुल पाण्याखाली गेल्याने शनिवारी सकाळीपासून दोन गावांमधील संपर्क तुटला आहे.

             शनिवारी सकाळी दक्षिण मांड नदीतील पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने नदीला महापुर आला. त्यामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या नदीतून प्रचंड वेगाने वाहणारे पाणी व त्यामुळे नदीला आलेला महापूर पाहण्यासाठी काले ता. कराड येथे ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी पुराच्या पाण्यासह पाणी पाहायला ग्रामस्थांनी केलेल्या गर्दीचा येथील युवकांनी काढलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होत आहे. 

                   कालवडे-बेलवडे संपर्कही तुटला 

कराड तालुक्यात सलग आठवडा भरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी लहान मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील कासारशिरंबे येथील पाझर तलाव ओसंडून वाहू लागल्याने बेलवडे बुद्रुक- कालवडे गावादरम्यानच्या ओढ्यावरील पुलावरून पाणी गेले आहे. त्यामुळे दोन-चार दिवसांपासून दोन्ही गावातील संपर्क तुटला असून मालखेड, वाठार मार्गे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.