16.4 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा 

दुचाकीवरून आलेल्या युवकांनी  कर्मचाऱ्यावर केले कोयत्याने वार; सुमारे सव्वा लाखांची रोकड लांबवली  
कराड/प्रतिनिधी : –
पुणे-बंगलुरु महामार्गावरील वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीतील गणेश पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री १ वाजता सशस्त्र दरोडा पडला. पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोर युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्यांनी कर्मचाऱ्याजवळील सुमारे सव्वा लाखांची रोकड हिसकावून तेथून पोबारा केला.
दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील परशुराम सिद्धार्थ दुपटे हा कर्मचारी जखमी झाला आहे. महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बंगलोरु महामार्गालगत ऋषिकेश पांडुरंग गावडे यांच्या मालकीचा गणेश पेट्रोलपंप आहे. या पंपावर सोमवार (दि. १०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी परशुराम दुपटे येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते. दरम्यान, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले. त्याचवेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले. ते पैसे घेऊन दुपटेे आपल्याजवळील बॅगमध्ये ठेवत असतानाच पाठीमागील युवकाने त्याच्या शर्टातून आणलेला कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर, पायावर आणि हातावर सपासप वार केले. ते वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी दरोडेखोराने दुपटे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत दुचाकीवरून तेथून पोबारा केला. त्या बॅगमधील १ लाख २० हजार ९३५ रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले.
घटना घडल्यानंतर याबाबत पेट्रोलपंपाचे मॅनेजर निलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मॅनेजर तावरे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या