वाठार येथील घटना; चोर म्हटल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचे कृत्य
कराड/प्रतिनिधी : –
वाठार (ता. कराड) येथे पाच वर्षीय बालिकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोर म्हटल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलीनेच हे केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिच्याकडे कसून तपास सुरु आहे.
संस्कृती रामचंद्र जाधव (वय ५ वर्षे) रा. वाठार (ता. कराड) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, संस्कृती जाधव (वय ५ वर्षे) रा. वाठार (ता. कराड) ही चिमुकली गुरुवार (दि. 10) रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी तिची शोधाशोध केली. परंतु, ती मिळून आली नाही. अखेर याबाबतची तक्रार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलिसांनी वाठार येथे दाखल होत रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती मिळून आली नव्हती.
शुक्रवार (दि. ११ रोजी) पहाटे ५ वाजता कराड तालुक्यातील वाठार-रेठरे रस्त्यालगत बेपत्ता संस्कृती जाधव या बालिकेचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, चौकशीअंती एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्याला चोर चोर म्हटल्याच्या कारणावरून संस्कृती जाधव या बालिकेचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित संशयित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिच्यासह तिच्या कुटुंबीयांकडे कसून तपास सुरू आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.