13.6 C
New York
Tuesday, April 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

सूत्रांच्या माहितीनुसार… ?

कृष्णाकाठ / दि. 15 एप्रिल 2025/ अशोक सुतार

सूत्रांच्या माहितीनुसार… ?

 

उप मुख्यमंत्री अजितदादा पवार नुकतेच सातार्‍यात येऊन गेले. रयत शिक्षण संस्थेची बैठक हे निमित्त होते; परंतु चर्चा राजकीय होती. अजितदादांनी पत्रकारांना म्हटले की, सूत्रांच्या माहितीनुसार सांगणे बंद करा. अमित शहा यांचा टेकऑफ मुंबईत होईपर्यंत मी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर होतो. एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत. अर्थखात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार ते अमित शहा यांच्याकडे करतील, असे मला वाटत नाही. दर आठवड्याला सरकारच्या विविध निर्णयासाठी आम्ही एकत्र बसत असतो, बोलत असतो. चर्चा करून मार्ग काढत असतो. आमचे सर्व व्यवस्थित चालले आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिली. दादांना राज्यातील मुख्यमंत्री ,दोन उप मुख्यमंत्र्यामधील संबंध मधुर असल्याची स्पष्टोक्ती द्यावी लागली. कारण दोन उप मुख्यमंत्र्यांचे आपसांत पटत नाही, हा संदेश सर्वत्र बाहेर फिरत आहे. अजितदादांचे म्हणणे हे की, पत्रकार काहीबाही छापतात आणि अफवा सुरू होते. असो. राजकारणात आभाळ फाटलं तर ते त्वरीत शिवणारा दर्जी हवा असतो. म्हणजे ते कौशल्य असल्याशिवाय राजकारणी होता येत नाही हे खरे आहे. 

रयत शिक्षण संस्थेची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजितदादा पवार बोलत होते. अर्थखात्याच्या फायली क्लिअर होत नसल्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ना. अजित पवार म्हणाले, अमित शहा याबाबत काहीही बोलले नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार असे काही मला सांगू नका, मी सकाळपासून अमित शहा यांच्यासोबत होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. त्यांना काही सांगायचे असेल तर ते मला स्वत: बोलतील. ते तिकडे तक्रार करतील असे वाटत नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही दोघे आठवड्यातून एकत्र बसून चर्चा करत असतो. सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयाबाबत चर्चा करून मार्ग काढत असल्याचे अजितदादा म्हणाले. राज्याला दोन उप मुख्यमंत्री असल्यामुळे बर्‍याच वेळा पत्रकार परिषदेत बोलताना दोघे एकमेकांना कोपरखळ्या मारत असतात.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघे एकमेकांना चिमटे काढणे, कोपरखळ्या मारत असतात. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी मानधन वाढवून देण्याचा निर्णय जाहीर करताना अजितदादांनी म्हटले होते की, या योजनेतील लाभार्थी महिलांना हप्ता वाढवून मिळणार नाही. राज्यातील महिला नाराज झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना राग पवारांचाच येणार, आशा काही बातम्या छापून आल्या की, पत्रकार वाईट होतात. रायगडावरील कार्यक्रमात बोलण्यासाठी संधी न दिल्याबाबत विचारले असता ना. अजितदादा म्हणाले, मला बोलण्यास सांगितले पण खूप वेळ झाल्याने मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबतच्या अडचणी सांगितल्या.

जिल्हा परिषदेच्या नियमाबाबत विचारले असता ना. अजितदादा म्हणाले, राज्यातील गोरगरींबाच्या मुलांना शिक्षण देण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचे योगदान आहे. स्व. आर. आर. पाटील हेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले त्यांची मुलेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली ही वस्तुस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळांमधील काही शिक्षक चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतात. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सेमी इंग्रजी सुरू करण्यात आले आहे. सीबीएससी शिक्षणाबाबतच्या हालचाली शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात, पण त्यात तिरकसपणा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन उप मुख्यमंत्र्यांशी जुळवून घ्यावे लागत असेल. कारण दोघांना वाटणार की, मुख्यमंत्री नेमके कोणाला झुकते माप देत आहेत ? असा प्रकार आजच्या राजकरणात घडला तर विशेष वाटू नये. आता संशयाचे राजकारण जास्त आहे.

सध्याचे राजकारण, कुणावरही विश्वास ठेवू नये इतपत आहे. अति आत्मविश्वास ठेवणेही चुकीचे ठरू शकते. एकनाथ शिंदे यांना राज्य सरकारमध्ये जास्त अधिकार आहेत की अजितदादांना असा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. कोण कशासाठी दिल्लीला गेले, कोण कुणाला भेटले याचा राजकारणात जास्त विचार केला तर राज्याचा विकास कधी करणार ? विधिमंडळाच्या सभागृहात विकासकामांबद्दल चर्चा होण्याऐवजी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे, एकमेकांची खिल्ली उडवणे असे हिणकस प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे अजितदादा म्हणाले ते काही अंशी खरेही असू शकते, असे वाटते. सूत्रांच्या हवाल्यानुसार म्हणत प्रत्येकजण वेगळेच काहीतरी मांडतो. परंतु अंदाज वर्तवणे म्हणजे वास्तव सांगणे नव्हे, याचाही विचार झाला पाहिजे. बाकी राजकारण म्हणजे गप्पांचा फड झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या