शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त; मुलगा व मुलीला सासू-सासर्यांकडे ठेवल्याने ते बचावले
कराड प्रतिनिधी :-
अहमदाबादमध्ये (गुजरात) गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमान कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. या अपघातात तब्बल 241 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत सदर विमानातून प्रवास करणार्या कराड येथील ज्योती व प्रकाश ढवळीकर यांची मुलगी कल्याणी ढवळीकर हिचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी विमान अपघातात कराडची कन्या गमावल्यामुळे कराडकरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील सोमवार पेठ भैरवनाथ गल्लीत ज्योती व प्रकाश ढवळीकर वास्तव्य करतात. त्यांची इंजिनिअर असणारी कन्या कल्याणी हिचा विवाह अहमदाबाद येथील उद्योजक गौरवकुमार ब्रह्मभट यांच्याबरोबर झाला होता. ते दोघेही अहमदाबादमध्ये राहत होते. अहमदाबाद लंडनला जाण्यासाठी
एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमानातून ते प्रवास करत होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजतात कल्याणीचे आई, वडील, भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही बातमी कराड शहरात पसरली. त्यामुळे कराडची एक कन्या गमावलीची हळहळ कराडकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलीला घरीच कल्याणीच्या सासू-सासर्यांकडे ठेवले होते. मुलगा इयत्ता दहावीच्या वर्गात, तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.