पाटणः-
सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून बहुतांशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कराड जवळील कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर संभाव्य पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमिवर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. तर हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जाहिर केला आहे. कोयना, धोम,कन्हेर,उरमोडी,तारळी, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकठच्या गावाला सतर्कतेचा ईशारा दिला असून कराड व सांगलीला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पावासाचा जोर असाच वाढत राहिला तर धरणाच्या येव्यानुसार पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रात गेले दोन तीन दिवस सततचा सुरू असलेल्या पावसामुळे सोमवारी रात्री 11 वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून सात फुटांवर उचलण्यात आले आहेत. यामुळे कोयना नदीतील विसर्ग वाढला असून नदीपात्रात प्रतिसेंकद 46,900 क्युसेक पाणी येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याची वाढ झाली आहे. संगमनेर धक्का जुना पुल पाण्याखाली गेला असताना आणि मुळगाव पुलाला पाणी घासून चालले आहे. कोयना नदीला महापूर सदृश स्थिती निर्माण झाली असून नदी काठावरील गावांसह पाटण, कराड, सांगली शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी दिवसभर पावसाचे वाढते प्रमाण व पाण्याची आवक पहाता सायंकाळी 4 वा सहा वक्र दरवाजे 3 फुटांवरून उचलण्यात आले होते. मात्र धरणात प्रतिसेंकद 50 हजार क्युसेक येणार्या पाण्याची आवक पहाता रात्री 8 वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवरून 5 फुटांवर उचलण्यात आले तर रात्री 11 वाजता दरवाजे सात फु टांनी उचलले. यामुळे वरील सहा वक्र दरवाज्यातून 44,800 क्युसेक तर कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीपात्रात एकूण 46,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे नदीकाठावरील गावांसह पाटण, कराड, सांगली या शहरांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
कोयना धरण छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रासह परिसरात गेले तीन चार दिवस पावसाने पुन्हा दमदार जोर धरला आहे. पावसाच्या या वाढत्या प्रमाणामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून प्रतिसेंकद 50 हजार क्युसेक पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाणी साठा 96.87 टिएमसी झाला आहे. मागील 24 तासात म्हणजे रविवारी सायंकाळी 5 वा ते सोमवारी सायंकाळी 5 वा. पर्यंत कोयना- 148 मि.मी (एकूण- 3501) नवजा- 208 मि.मी (एकुण- 4176) महाबळेश्वर- 188 मि.मी (एकुण- 4116) एवढी नोंद झाली आहे. पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करु नये. पावसाचे वाढते प्रमाण पहाता आवश्यकता वाटल्यास धरणातून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविला जाईल असे धरण व्यवस्थापना कडून सांगण्यात आले आहे. यासह नदीकाठावरील गावांसह कराड, सांगली या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.