कराड शहरात भव्य मिरवणूक;विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी:-
हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून कराड शहर व परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा अनंत चतुर्थी आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने गुरुवारी मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या उपस्थितीत काढलेल्या मिरवणुकीमुळे, तसेच मिरवणूक मार्गावर नागरिकांनी फुलांचा वर्षाव केल्याने शहरात ऐक्य, सलोखा आणि धार्मिक उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले.
जयंतीच्या दहा दिवस आधीपासूनच शहर परिसर धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी गजबजून गेला होता. समाजातील कार्यकर्त्यांनी गरजू आणि गरीब कुटुंबांना मदतीचा हात देत धान्य व वस्त्रवाटप केले. गुरुवार पेठेत भरवलेल्या चित्रप्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात दिल्ली व मुंबई येथून आणलेले ऐतिहासिक दस्तऐवज विशेष आकर्षण ठरले. शहरातील विविध भागात उभारण्यात आलेल्या मक्का-मदीना मशिदीच्या प्रतिकृतींनी देखील वातावरण भारावून टाकले.
गुरुवारी सकाळी जामा मस्जिद येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक चावडी चौक, मेन रोड, दत्त चौक, बसस्थानक, विजय दिवस चौक, सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जोतिबा मंदिर, कन्याशाळा मार्गे परत जामा मस्जिद येथे दाखल झाली. शहर व परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता. मिरवणुकीत सजवलेले उंट, घोडे, बग्ग्या आणि रथांनी विशेष लक्ष वेधून घेतले.
मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने प्रभावी व्यवस्था केली होती. सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उप अधीक्षक राजश्री पाटील, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाचाही या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, शहरात दिवसभर धार्मिक उत्साहाचे वातावरण राहिले. ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीने सामाजिक एकोपा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश दिला.