मराठा संघर्षासाठी योगदान दिल्याबद्दल मराठा बांधवांची कृतज्ञता
कराड/प्रतिनिधी : –
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई व नवी मुंबई येथे साथ देणारे साताऱ्याचे सुपुत्र, आमदार शशिकांत शिंदे यांचा आज कराड येथे जाहीर नागरी सत्कार होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जारंगे पाटील यांनी मुंबईत उपोषण छेडले असता, संपूर्ण महाराष्ट्रातून समाजबांधव धावून आले. प्रशासनाने आंदोलकांवर अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी समाजाने एकजुटीने त्याला तोंड दिले. याच काळात नवी मुंबई येथे लाखो मराठा बांधवांची निवास व जेवण व्यवस्था करण्याची धाडसी जबाबदारी आमदार शिंदे यांनी स्वीकारली.
आंदोलनाच्या काळात समाजाची सेवा करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांचा कृतज्ञता म्हणून सत्कार करण्याचा निर्णय सकल मराठा समाज कराड तालुका यांच्यातर्फे घेण्यात आला असून, त्याअंतर्गत हा सोहळा आयोजित केला गेला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा आंदोलनात शहीद झालेल्या रोहन तोडकर यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देणे, तसेच आंदोलकांच्या जबाबदाऱ्या पार पाडणे यांसह वेळोवेळी समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. कामगार चळवळीतील, तसेच समाजकारणातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांना स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे.
हा नागरी सत्कार सोहळा आज शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. नवीन सर्किट हाऊस, कराड येथे पार पडणार आहे. यावेळी मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी योगदान देणाऱ्या वकीलांचाही गौरव करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाज कराड तालुक्यातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.