पालकमंत्री चंद्रकांतदादा;माझ्यावरील आरोपांना घाबरत नाही,बिनधास्त चौकशी करा
सांगली/प्रतिनिधी:-
पुण्यातील जमिनीत 350 कोटींचा घोटाळा केल्याचा माझ्यावरील आरोप नवीन नाही. याची यापूर्वी दहा वेळा चौकशी झाली आहे. त्यातून काही सिद्ध झाले नाही, आता पुन्हा जयंत पाटील यांनी हा आरोप केला आहे. याचीही नव्याने बिनधास्त चौकशी करा मी त्याला घाबरत नाही. या आरोपाने मी अस्वस्थही होत नाही. पण लॉटरी घोटाळ्याचे नाव घेतल्यावर जयंत पाटील अस्वस्थ का होतात? आम्ही टोप्या फेकल्या, त्या तुमच्या डोक्यावर फीट्ट का बसल्या? असे सवाल करत तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही त्यामुळे काचेच्या घरात बसून दुसर्यांच्या घरावर दगड मारणे बंद करावे, अशी टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सांगली महापालिकेतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांनी 350 कोटींच्या घोटाळ्याबाबत माझ्यावर ट्विट केले आहे. पण याला आम्ही घाबरत नाही कारण याची यापूर्वी दहा वेळा चौकशी झाली आहे. त्यात काही सिद्ध झालेले नाही. त्यामुळे अशा आरोपांनी मी अस्वस्थ देखील होत नाही. आता अकराव्यावेळी देखील चौकशी होऊ दे माझी त्याला तयारी आहे.
लॉटरीचा घोटाळ्याची चौकशी करू म्हणाल्यावर जयंतराव एवढे अस्वस्थ का झालात? मी लॉटरी घोटाळ्यात एक माजी अर्थमंत्री, बिल्डरच्या डायरीत नाव असलेला ठाणे जिल्ह्यातला एक आमदार, वाशी मार्केटच्या घोटाळ्यात एका पक्षाचा नेता असे म्हणालो होतो. कोणाचीही नावे घेतली नव्हती. आम्ही केवळ टोप्या फेकल्या, त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या ? तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे असाल तर अस्वस्थ का होताय ? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
मंत्री पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील यांच्यावर आ. गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही कोणाला, मुख्यमंत्र्यांनाही मान्य नाही. आ. पडळकरांची ही भाषा महाराष्ट्राच्या नव्हे तर, मानवी संस्कृतीतच बसत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना समज दिली आहे. पण ते कारण काढून आ. जयंत पाटील बचाव नावाची जी सभा झाली, त्या सभेत आ. गोपीचंद पडळकर बाजूला राहिले, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात आले. या सभेत त्यांना आका, टरबुजा म्हटले गेले, त्यांची बायको काढली, आम्ही हे चालू देणार नाही. त्यामुळेच याला उत्तर देण्यासाठी 1 ऑक्टोबरला सांगलीत इशारा सभा घेतली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील टिकेबाबत खुलासा करताना आ. जयंत पाटील म्हणाले, ज्या फेसबुक पेजवरील स्टेटमेंटच्या बातम्या होत आहेत, ते माझे अधिकृत फेसबुक पेज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माझ्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बनवलेलं फॅन पेज आहे. या पेजवरील कोणत्या पोस्टशी माझा संबंध नाही. मी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात पाहणी व पीडित शेतकर्यांना मदत करण्यात व्यस्त आहे. या पोस्ट धरुन ज्या बातम्या येत आहेत, असे कोणतेही राजकीय स्टेटमेंट मी केले नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटलांनी पिलावळांना शांत बसवावे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही गोपीचंद पडळकर यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. पण आ. जयंत पाटील यांची पिलावळे आमच्या नेतृत्वावर बोलत आहेत तर आम्ही शांत बसणार नाही. जयंत पाटील यांनी त्यांच्या पिलावळांना शांत बसायला सांगितले तर, आम्ही शांत बसू. जयंत पाटील यांनी जाहीर करावे की, या जिल्ह्यात आजपासून अशा प्रकारचे विषय होणार नाहीत तर आम्ही सभा रद्द करतो. मात्र त्यांनी पहिले हे जाहीर करावे.
काय बोलू नये.. सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवावे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती भयंकर घसरली आहे. मी यासाठी गेली दोन वर्षे सांगतोय राज्यातील प्रमुख सर्वपक्षीय 20 नेत्यांनी एकत्रित बसून यावर विचारविनिमय करावा. काय बोलायचे, काय बोलायचे नाही, हे ठरवावे पण यावर कोणालाही काही पडलेले नाही. त्यामुळे कोणी काहीही बोलत आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील आणि त्यांचे पिलावळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमच्या नेतृत्वावर बोलणार असतील तर, आम्ही काहीही ऐकून घेणार नाही.