spot_img
spot_img
spot_img
spot_img

कराडची ग्रामदेवता-श्री कृष्णामाई देवी

कराड/प्रतिनिधीः-
येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर वसलेले कराड शहर धार्मिक व सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. या नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला यंदाही भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाचे स्वरूप लाभले आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांत कराड शहरासह जिल्हाभरातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असून, मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे.
कराडकरांच्या मनात कृष्णामाई देवीचे विशेष स्थान आहे. कृष्णा नदीचे साक्षात रूप मानल्या जाणार्‍या देवीसमोर संकटकाळी कराडकर प्रथम माथा टेकतात. नवरात्राच्या आरंभीपासून दररोज सकाळ-संध्याकाळ विशेष पूजा, महाआरती आणि देवी अर्चना सुरू आहेत. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात पारंपरिक ढोल-ताशे, देवीच्या गजरात भक्तांची गर्दी आणि देवीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमत आहे.
कृष्णामाई मंदिराचे ऐतिहासिक महत्त्वही तितकेच लक्षणीय आहे. यादवकालीन स्थापत्यशैलीवर आधारित हे दगडी मंदिर नंतर पेशवे व स्थानिक सरदारांच्या काळात पुनर्बांधणी होऊन अधिक भव्य स्वरूपात उभे राहिले. मंदिरातील देवीची मूर्ती अतिशय सुबक, देखणी आणि भक्तांना मन:शांती देणारी आहे. आजही हे मंदिर कराडच्या धार्मिक तसेच सांस्कृतिक जीवनाचे केंद्रस्थान मानले जाते.
कृष्णामाई देवीचा उत्सव हा तीनशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा सांभाळतो. इ.स. 1709 मध्ये कृष्णाकाठी देवीची स्थापना करण्यात आली. पुढे औंध संस्थानच्या कारकिर्दीत इ.स. 1811 मध्ये या उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर आजअखेर हा उत्सव अखंडपणे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत आहे. स्थानिक नागरिकांबरोबरच कराडबाहेरील भाविक देखील उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात.
कृष्णामाई मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचेही केंद्र आहे. नवरात्राच्या काळात मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजनी मंडळे आणि भक्तिगीते यांचे आयोजन केले जाते. यामुळे कराडकरांची एकजूट आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित होतो.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कराड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णामाई देवीचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांच्या ओसंडून वाहणार्‍या श्रद्धेने मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा कराडच्या धार्मिक-सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरत असून, कृष्णामाई देवीचे नवरात्रोत्सव हा कराडकरांसाठी अभिमानाचा सोहळा बनला आहे.
कराडच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमावर कन्यागत पर्वकाळात हजारो भक्त एकत्र येतात. कृष्णामाई देवीचा उत्सव, संगमात स्नान, देवी पूजन आणि कन्यागतींचे स्वागत आदी धार्मिक विधी पार पडतात. स्थानिक पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ, होम, अभिषेक यांसारखे विधी पार पडतात. या पर्वाच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येतात. यावेळी सामूहिक पूजा, कीर्तन, प्रवचन आणि हरिपाठांचे आयोजन होत असल्याने समाजात एकात्मता आणि धार्मिक एकता जाणवते. तसेच कृष्णामाईला साडी नेसवली जाते. या धार्मिक विधीवेळी महिला, युवतींची मोठी गर्दी असते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या