सांगली/प्रतिनिधी:-
अवसायनातील वसंतदादा बँकेत अडकलेल्या महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींपैकी 3 कोटी 70 लाख रुपयांच्या ठेवी पालिकेला परत मिळाल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आयुक्त सत्यम गांर्धी यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या कस्टोडियन व मनपाच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रयत्न केले.
महापालिकेने 10 डिसेंबर 1998 रोजी वसंतदादा बँकेत खाते सुरू केले होते. महापालिकेचा स्वनिधी, शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान याची वेळोवेळी गुंतवणूक ठेव स्वरूपात या बँकेत ठेवली होती. ही रक्कम साधारण 32 कोटींच्या घरात होती. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने 12 जानेवारी 2009 रोजी न्वसंतदादा बँकेचा परवाना रद्द केला. बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली. या बँकेत महापालिकेच्या ठेवी व्याजसह ठेवी 43 कोटी 99 लाखांच्या ठेवी अडकल्या. या ठेवींवर 20 ऑगस्ट 2011 पासून शेकडा 18 टक्के व्याज दराने होणारी मुद्दलसह व्याजाची रक्कम 356 कोटी 22 लाख 99 हजार रुपये येणेबाकी वसुलीसाठी तत्कालिन आयुक्त शुभम गुप्ता यांनी बँकेच्या अवसायकांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटीसीला बँकेच्या अवसायकांनी देखील उत्तर दिले होते. शुक्रवारी बँकेने महापालिकेला 3 कोटी 70 लाख रूपयांच्या ठेवी परत दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, समित कदम आदी उपस्थित होते.
ठेवींच्या रकमेतून रस्ते दुरूस्त कराःपालकमंत्री
महापालिकेच्या वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेल्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी 70 लाखांच्या ठेवी परत मिळाल्या आहेत. पालिका प्रशासनाने या रकमेतून शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत, असे पालकमंत्र्यांनी सांगतले.