डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला वळण
कृष्णाकाठ / अशोक सुतार
०४ नोव्हेंबर २०२५
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे पीडिता डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर मोठा गदारोळ उठला आहे. राज्यभर हे प्रकरण चर्चेत आले. माढाचे माजी खासदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समर्थक रणजितसिंह ना. निंबाळकर सदर प्रकरणात पुरते अडकले आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटणला येतानाच निंबाळकर यांना क्लीनचीट दिल्याचे पत्र आणले आणि ते मिस्टर क्लीन आहेत असे सांगितले. रणजितसिंह ना. निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आहेत. लोकसभा निवडणूक्त त्यांचा नुकताच पराभव झाला, तरी ते सक्रीय आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ताकद व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची साथ यामुळे पराभवानंतरही फलटणमध्ये रणजितसिंहांचीच चलती सुरू आहे. फलटणमध्ये निंबाळकरांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्यावर आरोप करणार्यांना निंबाळकर यांनी फलटणमध्ये येऊन आरोप करा आणि मी उत्तरे देणार असे आव्हानही केले आहे. मयत पीडिता डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने पोलिस प्रशासन, स्थानिक राजकारणी यांची भ्रष्ट युती कशी झाली, याचे दर्शन घडवले. विरोधकांचे सातत्याने होणारे आरोप जर खरे असतील तर फलटणमध्ये अशी भ्रष्ट युती झाली होती का ? अमानवी प्रकार घडले का ? असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकासमोर निर्माण होत आहेत.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला एका युवकाच्या प्रेम प्रकरणाचा मुलामा देण्यात आला. नंतर डॉ. संपदा मुंडे कशा बदचलन होत्या, याचेही कवित्व करण्यात अनेकांना रस होता. महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रूपाली चाकणकर फलटणमध्ये आल्या आणि मुंडे यांची बदनामी करून गेल्या. आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष असून पीडितेला न्याय द्यायला पाहिजे, असेही त्यांच्या मनात डोकावले नाही. फलटण येथील प्रकरण साधे नाही, असे समजल्यावर या प्रकरणातून अनेक धागे बाहेर येऊ लागले आहेत, इतिहासातील काही घटना समोर उभ्या राहू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फलटणची घटना घडल्यानंतर लगबगीने फलटण दौर्यावर आले आणि त्यांनी माजी खासदारांना क्लीनचीटही दिली. मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी राजकारण करू नये, आम्ही सर्व तपास पारदर्शक पद्धतीने करणार आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातून अनेक जुनी प्रकरणे बाहेर पडत आहेत. शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी या प्रकरणी, माढ्याचे माजी खासदार निंबाळकर हे फलटणमध्ये अनेक खेळ करत असल्याचे म्हटले आहे. निंबाळकरांबद्दल अजून पुरावे बाहेर आलेले नाहीत आणि ते येतील हेही सांगता येत नाही. डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एक पोलिस अधिकारी बदने आणि डॉ. मुंडे ज्या घरात रहात होत्या, त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लवकर केला, परंतु डॉ. मुंडे यांच्या चार पानी पत्रात उल्लेख केलेल्या आणि सातत्याने अनेक गोष्टींत त्यांच्यावर दबाव टाकणार्या माजी खासदार निंबाळकर यांची चौकशी करण्याचे पोलिसांनी टाळले आहे. काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट फलटणच्या विषयावर भाष्य केल्याने पुन्हा निंबाळकर देशभर चर्चेत आले. आधीच खा. संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रणजितसिंहांचे नाव घेवून त्यांच्यावर तोफ डागली.
शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटणमधील दिगंबर आगवणे, ज्यांनी पूर्वी भाजपकडून आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि सध्या ते इडीच्या कारवाईमुळे आत म्हणजे जेलात आहेत, त्यांच्या दोन मुलींना प्रसारमाध्यमांसमोर आणले. कित्येक महीने दिगंबर आगवणे जेलमध्ये आहेत. त्यांच्या मुलींना धमकी दिली जाते, दबाव टाकला जातो. अंधारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, आगवणे यांच्या मुलींवर दबाव टाकणारे व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून माजी खासदार निंबाळकर आहेत, असा स्पष्ट आरोप त्या पीडित दोन मुलींनी केला आहे. एवढेच नव्हे तर आगवणे यांच्या मुलींनी स्वत:चे बरेवाईट करून घेण्याचा प्रकारही काही महिन्यांपूर्वी घडला होता. फलटणजवळील आदर्की गावातील रत्नशिव निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदा मुंडे वर दबाव होता, असेही आता म्हटले जात आहे. हा आरोप मयत रत्नशिव निंबाळकर यांच्या कुटुंबियांनी केला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी कर्तव्यावर असताना धमक्या, दबावाचे राजकारण, पोलिसांचा दबाव हे सर्व सहन केले. त्यादरम्यान, त्यांना कार्यालयीन दबावही असणे शक्य आहे. या सर्व त्रासातून डॉ. मुंडे यांनी आयुष्याचा शेवट करून घेतला. आम्ही पूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण हे भ्रष्ट व्यवस्थेची काळी बाजू आहे.
रामराजे निंबाळकर यांना बॅकफूटवर आणून रणजितसिंहांचे साम्राज्य सुरू झाले असतानाच फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे या युवतीच्या आत्महत्या प्रकरणात रणजितसिंहांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात डॉ. संपदा मुंडे यांच्या झालेल्या चौकशीला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या अहवालात, खासदार व त्यांच्या दोन पीएंनी फोन केला होता, असा उल्लेख केला आहे. त्यावरूनच माजी खासदार असलेल्या रणजितसिंहांवर सर्व बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रणजितसिंहांनी आरोप फेटाळत निपक्ष चौकशीची मागणी केली, ते सभेत रडलेही ! राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी रणजितसिंहांना टार्गेट केले. स्वकीयांमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही निंबाळकर यांच्यावर टिका केली आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीत, डॉ. संपदा मुंडे यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते, ते माजी खासदारांचे दोन पीए आणि इतरांची निपक्ष चौकशी होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.





                                    