spot_img
spot_img
spot_img
spot_img

संतांच्या कुंभमेळ्याची वृक्षांना झळ

कृष्णाकाठ

अशोक सुतार / ८६००३१६७९८

 

समाजामध्ये लाकूडतोडीच्या समस्येमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. उदा. पर्यावरणाचा र्‍हास, हवामान बदल, जमिनीची धूप आणि नैसर्गिक संसाधनांचा अभाव असे परिणाम वृक्षतोडीमुळे दिसून येतात. अवैध वृक्षतोड आणि नैसर्गिक संसाधनांचे चुकीचे व्यवस्थापन यांमुळे अनेक समस्या उद्भवतात, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि सामाजिक जीवन विस्कळीत होते. असाच प्रकार नाशिक शहरात घडत आहे. नाशिकमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगात सुरू झाली आहे. देशभरातून येणार्‍या हजारो साधू-संतांसाठी तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. मात्र वृक्षतोडीमुळे साधूग्राम प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. साधुग्रामसाठी नाशिक महापालिकेने १८२५ झाडे चिन्हांकित केली आहेत. हे लक्षात आल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आक्षेप नोंदविला आहे. महानगरपालिकेला तीन दिवसांत सर्व हरकतींवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नंतर अंतिम अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. यासाठी झालेल्या जनसुनावणीत पर्यावरणवाद्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. झाडे तोडून तुम्ही कसला विकास करता आहात ? निसर्गाला ओरबाडून साधुंसाठी राहण्याची सोय कुंभमेळ्यात केली तर पुन्हा तो निसर्ग बहरायला अर्धे शतक कालावधी जाईल, ही भीती आहे.

——————————————————————————–

पूर्वी नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे. मागील काही वर्षांत नाशिकची ही ओळख धूसर बनली आणि नाशिक येथे रखरखीत उन्हाळा निर्माण होत आहे. यातच आगामी कुंभमेळ्यामध्ये साधुग्रामसाठी हजारो झाडे तोडण्याच्या प्रक्रियेत नाशिक महानगरपालिकेने पारदर्शकता राखलेली नाही, यामुळे नाशिक महापालिकेवर भरवसा नसल्याचे पर्यावरण प्रेमींनी म्हटले आहे. वृक्षतोडीमुळे बंगळुरूसारख्या शहरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. आपण इतर शहरासारख्या चुका करत आहोत का ? असा प्रश्न अनेक जण व्यक्त करीत आहेत. हा प्रश्न झाडे न तोडता सोडविण्यासाठी विश्वासार्ह वातावरण तयार केले पाहिजे, असे राज्य सरकार, महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या लक्षात येत नाही का ? असे अनेक प्रश्न पर्यावरणवादी व्यक्त करीत आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. यावर उपाय म्हणून, लोकांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची गरज आहे. साधूग्राम प्रकल्पाला राज्यातील सुजाण नागरिकांचा विरोध बेसुमार वृक्षतोड करणार असल्यामुळे होत आहे.

नाशिक कुंभमेळा – २०२७ पूर्वी साधुग्राम प्रकल्प उभरायचे आहेत. त्यासाठी १८०० पेक्षा अधिक वृक्ष तोडले जाणार आहेत, ही कल्पनाच राक्षसी वाटते. सदर झाडांचे चिन्हांकन झाल्याने नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. नाशिक येथील पंचवटीतील पंडित पलूस्कर सभागृहात साधूग्रामबाबत सुनावणी झाली. खरे तर राज्य सरकार, महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाला बेसुमार वृक्षतोड करायची आहे. मूल उद्देश हाच आहे. या जनसुनावणीसाठी विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक आणि जागरूक नागरिकांनी हजेरी लावली होती. तपोवनची ओळख झाडांमुळे आहे, साधुग्राम दुसरीकडे उभारा; परंतु इथली एकही फांदी तोडू देणार नाही, असे जनसुनावणीत नागरिकांनी सुनावले. यावेळी अनेक जणांनी गत कुंभमेळ्यात एकही वृक्ष तोडला नसल्याची आठवण करून देत महापालिकेला आता घेत असलेल्या निर्णयाबद्दल जाब विचारला. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, १८२५ झाडे चिन्हांकित केली आहेत. यापैकी १७७५ झाडे तोडणीसाठी मागणी आहे. यात २५० जुनी व स्थानिक झाडे वाचवली जाणार आहेत. म्हणजे नाशिक महापालिका म्हणते की, प्रत्यक्ष जागेची पाहणी व सीमांकन केल्यानंतर आम्ही ५०० ते ७०० झाडे वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, प्रत्यक्ष १२०० झाडेच तोडणार आहोत.

उद्यान अधीक्षकांनी त्यांची बाजू स्पष्ट करीत म्हटले आहे की, झाडांवर झालेले चिन्हांकन म्हणजे तोडणी  असा अर्थ नाही. ती मोजणी आणि दस्तावेजीकरणाची प्रक्रिया आहे. परंतु यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. मूळ गोष्ट अशी आहे की, तपोवन हा जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी झालेल्या  कुंभमेळ्यांत झाडे वाचवण्यात यशस्वी प्रयत्न झाले आहेत, यावेळीही ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यास स्थानिक पर्यावरणावर दीर्घकालीन गंभीर परिणाम आहेत. याची भरपाई पैशाच्या रूपाने कदापि होणार नाही, पुन्हा वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करायचे म्हटले तर किमान ५० वर्षे सुस्थितीत येण्यासाठी लागतील. किंवा त्याहूनही जास्त कालावधी लागू शकतो. वृक्ष तोडल्यावर जैवविविधता, पशू पक्ष्यांचे, कीटकांचे, दुर्मिळ वनस्पतींचे अधिवास कायमचे नष्ट होण्याची भीती आहे. त्यापेक्षा नाशिक येथील आयोजित कुंभमेळ्यातील साधूग्राम प्रकल्प मोकळ्या जागेवर घेतला तर वृक्षांची कत्तल करावी लागणार नाही. अन्यथा, निसर्ग आपल्याला माफ करणार नाही.

कुंभमेळा असला तरी, विकास आणि पर्यावरण यातील समतोल साधून काय करायचे ते करा, असे राज्य सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अभ्यासपूर्वक केली पाहिजे, हेच जनमत सांगत आहे. तपोवनात १२०० एकर जागेवर साधूग्राम उभारले जाणार आहे. त्यातील ५४ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून ही जागा मोकळी करण्यासाठी येथील झाडांचे सर्वेक्षण करुन १८०० झाडांवर महापालिकेने फुली मारली आहे. ही झाडे तोडण्यात येणार असल्याच्या रागातून पर्यावरणप्रेमींनी वृक्ष आलिंगन आंदोलन सुरु केले आहे. ‘हे रामा, ही १८०० झाडे तुच वाचव, प्रशासनाला सुबुद्धी दे’, असा संताप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. संभाव्य वृक्षतोडीवरुन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका होत आहे. पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून वृक्षतोडीला विरोध होत आहे. कुंभमेळा मंत्री महाजन यांनी म्हटले आहे की, निसर्गाचे संगोपन झाले पाहीजे ही आंदोलकांची भूमिका अतिशय योग्य आहे. पण, कुंभमेळा हा १२ वर्षातून एकदा येतो. त्याकडे केवळ देशाचे नाही तर अवघ्या जगाचे लक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तपोवनातील साधूग्रामची परंपरा आहे. साधूग्राम साठीच ही जागा राखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळे झाडे काढावीच लागतील, त्याशिवाय साधू-महंताची व्यवस्था होऊ शकणार नाही. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचे हे अल्पज्ञान आहे असे वाटते. कारण पूर्वीचे साधुसंत निसर्ग बेचिराख करून अध्यात्म प्राप्त करत नव्हते. संतांनी निसर्ग वाचविण्याचे आवाहन केलेले आढळते. संत तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥ संत ज्ञानेश्वरांनी तर निसर्गातील विविध घटकांना ईश्वराचे रूप संबोधले आहे. त्यांच्या अभंगातून निसर्गाचे महत्व आणि आदर व्यक्त केला आहे.

साधूग्राम प्रकल्पात साधू संतांची राहण्याची सोय होणार आहे, असे मानले तरी निसर्गाच्या सान्निध्यात साधू संत का राहू शकत नाहीत ? हा प्रश्न उपस्थित होतो. झाडे तोडण्याची कल्पनाच आध्यात्मिक वाटत नाही. त्यामुळे बेसुमार झाडे तोडून साधूग्राम बांधणार्‍या राज्य सरकार, नाशिक महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाचा निषेध करावा तितका कमी आहे. पर्यावरणवाद्यांनी अशा खूळचट प्रयत्नांना नेहमीच विरोध केला पाहिजे; कारण निसर्ग वाचविणे आपले कर्तव्य आहे, तेच अध्यात्म आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या