पृथ्वीराज चव्हाण;एपीस्टिन फाईल्स बाहेर आल्यास भारताच्या राजकारणावर मोठा परिणाम
कराड/प्रतिनिधी:-
अमेरिकेतील जॉन्सन-एपीस्टिन प्रकरणावर 10 हजार पानांचा हा अहवाल अमेरिकन संसदेत मांडला गेला आहे. हे प्रकरण पूर्णपणे बाहेर आले, तर भारताच्या राजकारणात मोठे बदल होतील आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, याबाबत नवल वाटायला नको, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अजितराव पाटील-चिखलीकर, शहराध्यक्ष ड. अमित जाधव, नामदेवराव पाटील उपस्थित होते.
एपीस्टिन कागदपत्रे हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, मी या प्रकरणावर ट्विट केले आहे. महत्वाची माहिती हाती येईल, तेव्हा दिल्ली किंवा मुंबई येथे सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत हल्ला चढवताना चव्हाण म्हणाले, राज्यात लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. घटना दुरुस्ती धाब्यावर बसवून निवडणुका दहा वर्षे रखडवल्या. आता 20 नगरपालिकांच्या निवडणुका थेट आदल्या दिवशी पुढे ढकलून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली. तयारी नसताना घाईगडबडीने निवडणुका का घेतल्या? असा सवाल उपस्थित करत या पोरखेळाला मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. तसेच निवडणूक आयोग ही सर्वोच्च आणि निपक्षपाती संस्था असायला हवी. पण आज ती पूर्णपणे मोदी सरकारच्या नियंत्रणाखाली गेली आहे. राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचे पुरावे दिल्यानंतरही आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल 48 हजार दुबार नावे आहेत, त्यांची बूथनिहाय यादी माझ्याकडे आहे. हीच नावे इस्लामपूर, कराड उत्तर, पाटण, शिराळा, पलूस-कडेगावमध्येही आहेत. या प्रकरणात आपण स्वतः याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. याबाबत जनताच मला न्याय देईल, न्यायालयाकडून अपेक्षा नाही. पण सत्य परिस्थिती देशासमोर आणण्यासाठी ही लढाई असल्याचे ते म्हणाले. दोनदा मतदान केलेल्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. या प्रश्नावर लढा देणार्या गणेश पवार यांच्या धाडसी आंदोलनाचे त्यांनी कौतुकही केले. तसेच दुबार नावे आणि बोगस मतदानाच्या साहाय्याने विधानसभा निवडणुका चोरल्या गेल्या, असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला.
चव्हाण म्हणाले, इतके भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात कधीच आले नाही. मोठे उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत. एआयमुळे पुढील काही महिन्यांत गंभीर बेरोजगारी निर्माण होईल. लाखो विद्यार्थ्यांना नोकर्या मिळणार नाहीत. महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात. सरकारचे लक्ष्य फक्त कॉन्ट्रॅक्ट देणे आणि कमिशन घेणे, इतकेच, अशी टीका त्यांनी केली. लाडकी बहीण योजना चांगली असली तरी ती खर्या गरीबांना मिळावी. बांधकाम कामगार योजनेच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भांडी वाटली गेली, हा योजनेचा गैरवापर, असल्याचे त्यांनी सांगितले.
खुल्या जागेत घरे मोदीही देऊ शकत नाहीत!
पाटण कॉलनीतील खुली जागा ही पार्किंग आरक्षणातील असल्याने ती कोणालाही बदलता येत नाही, असे नामदेवराव पाटील यांनी स्पष्ट केले. येथील लोकांना अन्यत्र पुनर्वसनाचा पर्याय दिला होता, परंतु त्यांना या ठिकाणीच घरे हवी आहेत. मात्र या आरक्षणात बदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील त्यांना घरे बांधून देऊ शकत नाहीत, असा उल्लेख त्यांनी केला. दुबार मतदानावरील हरकतींची मुदत संपली असून, मतदानाच्या दिवशी दुबार नावांवर फुली मारून देण्यात येतील, असे प्रांताधिकार्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले.
कोट्यवधी’ निधीच्या घोषणा फोल
कराड पालिकेच्या सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवरही चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांनी 325 कोटी दिल्याचे सांगितले, पण कामांसाठी एकाही रुपयाचा मागमूस नाही, असे त्यांनी सांगितले. स्टेडियम बंद केल्याने व्यायामशाळेला येणार्यांची गैरसोय झाली, पाटण कॉलनीच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी दिलेला पर्याय लोकांनी नाकारला मात्र टीका करणार्यांनी दीड वर्षांत काय काम केले, हे सांगावे. अशा शब्दात त्यांनी अतुल भोसले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.





