चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना
कराड/प्रतिनिधी : –
कराड – रत्नागिरी महामार्गावरील ओंड – उंडाळे दरम्यान असलेल्या तुळसण पुलावर सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव शर्थीने वाचला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स लि. – रयत युनिट सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर तुळसण पुलावर आल्यानंतर अचानक ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटला. यामुळे धडधडत्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने प्रयत्न केले, परंतु तोपर्यंत ट्रॅक्टर पुलाच्या कठड्याला धडकून अर्धवट लटकलेल्या अवस्थेतच थांबला. काही क्षणातच अपघात एखाद्या थरारपटातील दृश्याप्रमाणे भीषण चित्र निर्माण करणारा ठरला.

दरम्यान, पुलाचा कठडा कोसळून ट्रॅक्टर व ऊसाने भरलेली ट्रॉली खाली सुमारे ५० ते ६० मीटर खोल असलेल्या ओढ्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र ट्रॅक्टर कठड्यात अडकून राहिला आणि चालकाने शांतपणे बाहेर पडत स्वतःचा जीव शर्थीने वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.
या अपघातामुळे तुळसण पुल परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.





