फलटण | प्रतिनिधी
फलटण शहरात आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धडक कारवाई करत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयात छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक व खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी कारवाई सुरू केली. त्यानंतर ईडी पथकाने थेट यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मोर्चा वळवला. सकाळी बँकेचे कार्यालय सुरू होताच बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.
कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्ज प्रकरणांशी संबंधित फाईल्स व डिजिटल रेकॉर्डची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाले असून, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
११२ कोटींच्या कथित अपहाराचे गंभीर आरोप
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच यशवंत बँकेच्या चेअरमनसह तब्बल ५० जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील लेखापरीक्षण तसेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले.
११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा कथित अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे.
बोगस कर्जप्रकरणे व बनावट कागदपत्रांचा वापर
फिर्यादीत नमूद केल्यानुसार,बोगस कर्ज प्रकरणे उभी करण्यात आली,खोटी व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली,तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वाटप करण्यात आले,जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडण्यात आली,
निधीचा उद्देशबाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवण्यात आला,तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करण्यात आला, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकांवर गुन्हा
या प्रकरणात यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व अन्य ९ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
ईडीकडून अद्याप अधिकृत माहिती नाही
सदर ईडी कारवाई याच गुन्ह्याच्या अनुषंगाने असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी ईडीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
पुढील तपशील आणि कारवाईचे नेमके स्वरूप अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.





