पुणे/प्रतिनिधी:-
ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), पुणे येथे दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी 18 व्या टप्प्यातील रोजगार मेळा अत्यंत उत्साहपूर्ण व सन्माननीय वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुरलीधर मोहोळ, खासदार, पुणे तसेच राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी माहिती देण्यात आली की गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या या राष्ट्रव्यापी कार्यक्रमांतर्गत देशातील 45 निवडक ठिकाणी 61,000 पेक्षा अधिक नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात येत आहेत. ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल्स, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ईपीएफओ व आयआयजीएम येथील 300 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. हे नव्याने नियुक्त झालेले युवक भारत सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये कार्यभार स्वीकारून प्रशासन व सार्वजनिक सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान देतील.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने नियुक्ती पत्रांच्या वितरणाचा शुभारंभ केला व नव्याने नियुक्त उमेदवारांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की ही नियुक्ती पत्रे केवळ नोकरीची ऑफर नसून, विकसित भारत 2047 या प्रवासात सक्रिय सहभागासाठीचे आमंत्रण आहे. विविध देशांसोबत करण्यात येणारे मुक्त व्यापार करार (एफटीए) युवकांसाठी अधिक संधी निर्माण करतील, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच जीएसटी 2.0, आयकर सवलती, मेक इन इंडिया उपक्रम आणि जागतिक समुदायाचा भारतावर वाढता विश्वास यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशाच्या प्रगती व विकासासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या संबोधनात मुख्य अतिथी श्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की संपूर्ण देश माननीय पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहे. कौशल्य विकास, मुद्रा योजना, स्टार्ट-अप इंडिया तसेच इतर युवकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून सरकारने स्वरोजगाराच्या माध्यमातून कोट्यवधी रोजगार संधी निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच समावेशक विकास व आर्थिक सशक्तीकरणावर सरकारच्या ठोस भरामुळे सध्याच्या काळात रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यापूर्वी वैभव निम्बाळकर, भा.पु.से., उप महानिरीक्षक, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे यांनी मुख्य अतिथींचे औपचारिक स्वागत व सत्कार केला. आपल्या भाषणात त्यांनी रोजगार मेळ्याला पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रियेद्वारे राष्ट्रनिर्मितीकडे नेणारा परिवर्तनकारी उपक्रम असल्याचे सांगितले. ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे हे एक जबाबदार आयोजक म्हणून अशा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे सुसूत्र, शिस्तबद्ध व सन्माननीय आयोजन करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नव्याने नियुक्त उमेदवारांनी राष्ट्रसेवेच्या काळात प्रामाणिकपणा, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचे सर्वोच्च मानदंड जपावेत, असे आवाहन त्यांनी केले.
नव्याने नियुक्त उमेदवारांनी या दूरदर्शी उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सरकारी सेवेत प्रवेशासाठी आपल्याला निष्पक्ष, पारदर्शक व समान संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा व समर्पणभावनेने राष्ट्रसेवा करण्याची आपली कटिबद्धता अधोरेखित केली. तसेच उत्कृष्ट व्यवस्था व सुरळीत आयोजनाबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कौतुक करून, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे आयोजित रोजगार मेळ्याच्या सुव्यवस्थित संचालनाची प्रशंसा केली.





