spot_img
spot_img
spot_img
spot_img

युद्धजन्य परिस्थितीचा आयात-निर्यातीवर मोठा परिणाम

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; अवकाळी पावसाने शेतकरी संकटात; नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मदतीची ग्वाही 
कराड/प्रतिनिधी :-
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम देशाच्या आयात-निर्यात व्यवहारावर होत असून, कृषी क्षेत्रालाही त्याचे पडसाद जाणवत आहेत. यामुळे खतांचा पुरवठा, शेतीमालाची निर्यात आणि बाजारभाव यावर परिणाम होत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कराड येथे दिली.
दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. कृषी व महसूल विभागाकडून अहवाल प्राप्त होताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. भरणे म्हणाले, यंदा हवामानात मोठे बदल दिसून येत असून, उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मार्च अखेरीसच तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, एप्रिलच्या मध्यापर्यंत त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेततळ्यांमध्ये साठा करावा, तसेच कापणीस आलेल्या पिकांची तातडीने कापणी करून सुरक्षित साठवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच युद्धामुळे खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगताना त्यांनी युरियासह आवश्यक कृषी साहित्याचा सध्यातरी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. मात्र भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता शासन सतर्क असून, शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच युद्धस्थिती लवकर निवळावी आणि जागतिक बाजारपेठ स्थिर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना भरणे यांनी शेतकऱ्यांना सावध राहून नियोजनबद्ध शेती करण्याचे आवाहन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या