पाटण:-
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने असलेली पाटण पंचायत समिती इमारत बाहेरुन टकाटक रंगरंगोटीने दिसत असली तरी या इमारतीच्या आत प्रवेश करताच दुर्गंधीचा दरवळ जाणवतो. इमारतीच्या आतील बाजूस व्हरांड्यात व मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त व मोडकळीस आलेले साहित्य, भिंतीचे कोपरे पिचकारीने रंगवलेले, लोंबकळत असलेल्या केबल, स्वच्छतागृहातील अस्वच्छता या दुर्गंधीचा दरवळ पंचायत समितीच्या संपूर्ण इमारतीत दरवळत आहे. बाहेरुन ही इमारत रंगरंगोटीच्या लाली पावडरने देखणी दिसत असली तरी इमारतीच्या आतील भाग मात्र नागरिकांना दुर्गंधीने हैराण करत आहे. संबंधित पंचायत समितीच्या यंत्रणेने या इमारतीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पाटण पंचायत समितीचा कारभार लोकनेते बाळासाहेब देसाई भवन या इमारतीतून सुरू आहे. ही इमारत बाहेरुन नीटनेटकी सुंदर आणि नवीन दिसत असली तरी आतून मात्र दुर्गंधीच्या दरवळाने दुर्गंधी पसरवत आहे. आतील स्वच्छता गृहाची अनियमित स्वच्छता, स्वच्छता गृहात पाण्याचा अभाव यामुळे येथील दुर्गंधीचा दरवळ अख्खा पंचायत समिती इमारतीत जाणवत आहे. इमारतीच्या व्हरांड्यात आणि मोकळ्या जागेत तुटलेले फर्निचर, तुटलेल्या खुडच्या, लोखंडी कपाटे, फर्निचर अस्ताव्यस्त अवस्थेत कूठेही ठेवलेले पडलेल्या अवस्थेत आहे. आतील भिंतीवर तंबाखू, गुटख्याच्या पिचकारी, लोंबकळत असलेल्या केबल हे या इमारतीच्या सौंदर्यात अडथळा निर्माण करत आहेत.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा पुढील दोन तीन दिवसात होत असताना या सदस्यांचे इमारतीच्या अस्वच्छतेकडे लक्ष जाणे अपेक्षित आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने असलेली ही इमारत तेवढीच साजेशी, नाविन्यपूर्ण पाटण तालुक्यात स्वच्छतेचा मुळमंत्र देणारी असावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.





