यानंतर शंभूराज देसाई एबीपी माझाशी संवाद साधण्यासाठी फोनवरून जोडले गेले. यावेळी देसाई आणि अंधारे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. शंभूराज देसाई म्हणाले की, सुषमा अंधारेंनी आम्ही काय म्हणत आहे ते घेतले पाहिजे. आता मी थोडं स्पष्टच बोलतो. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्हाला काही स्पष्टपणे बोलता येत नाही. तुम्हाला फक्त पैसे गोळा करता येतात, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
यावर शंभूराज देसाई म्हणाले, तुमचे म्हणणे आम्ही शांतपणे ऐकून घेतले. आता आमचे म्हणणेदेखील शांतपणे ऐकून घ्या. हा व्हिडिओ मी आताच पहिला आहे. याची चौकशी आम्ही करू. आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात 49 हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत, असे आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले.
यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्ही खालच्या अधिकाऱ्याला का बोलत आहात. तुम्ही राजपूतचे लाड का करत आहात? त्याला का पाठीशी घातले जात आहे? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. यावर शंभूराज देसाई म्हणाले की, कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचं साटंलोटं नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.