सातारा / प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून ९ लाख ४८ हजार रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सैफ अहमद नसुरूद्दीन शेख व सुषम भानुदास जाधव (दोघे रा. रामराव पवार नगर, गोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत संतोष बबनराव शिंदे (रा. दिव्यनगरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना एप्रिल २०२४ पासून घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित शेख व जाधव यांनी तक्रारदार शिंदे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी पैसे गुंतवल्यावर कसा परतावा मिळतो याचे एक पत्रकही दाखवले. तसेच शंभर रुपयांचा स्टॅम्पवर नोटरी करारनामाही करून दिला. त्यामुळे तक्रारदार संतोष शिंदे यांनी बहिण ज्योती पवार, मेहुणे तुषार कदम, मित्र अनिकेत साळुंखे, शिवराज टोणपे यांनाही पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार एकूण ९ लाख ४८ हजार रुपये सर्वांनी गुंतवले. मात्र ठरावीक कालावधीत झाल्यानंतर तक्रारदारासह इतरांनी पैसे परत मागितल्यानंतर संशयितांनी हात वर केले. फसवणूक झाल्याचे समोर झाल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.