टोलवसूली आदेशात गोलमालीची शक्यता वेळ मारून नेण्याची प्रशासनाची भूमिका..!
भाग 1
उंब्रज/अनिल कदमः-
तासवडे ता.कराड गावच्या हद्दीत सुरू असणारी टोलवसुली कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत आंदोलन स्थळी उपस्थित असणार्या आंदोलकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.चारपदरी महामार्गाच्या टोलवसुलीची मुदत 2023 मध्ये संपली होती यासाठी अधिकची तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर नक्की कोणता डाव झाला आणि पुनःश्च वसुली सुरू झाली याबाबत स्थानिकांच्यात रोष निर्माण झाला असून सध्या सुरू असणारी टोल वसुली ही बेकायदेशीर असल्याचा सूर उपस्थित आंदोलकांचा असून टोलचे मॅनेजर थोरात यांनी त्यांना अनुकूल असणारी माहिती वाचून दाखवल्याची कुजबुज सुरू होती यामुळे आता आंदोलक आरपारच्या लढाईच्या तयारीत असल्याने टोल प्रशासनाने आश्वासक पाऊल टाकले नाहीतर आंदोलनाचा भडका उडणार असल्याची चर्चा स्थानिक वाहन धारकांच्यात आहे.यामुळे तासवडे येथील टोलवसुली अधिकृत आहे का ?टोलवसुली आदेशात गोलमालीची शक्यता असून वेळ मारून नेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याबाबत स्थानिकांच्यात एकमत दिसून येत आहे.
चारपदरी टोलवसुलीची मुदत संपली असून नवीन सहापदरी मार्गाचे विस्तारीकरण अजून पंचवीस टक्केही पूर्ण झाले नाही तरीही टोलवसुली कशासाठी याचे ठोस उत्तर टोलप्रशासन देऊ शकले नाही शासन आदेशातील एखादी ओळ वाचून दाखवून नागरिकांचे समाधान होणार नाही आणि सदरचा शासन आदेश खरा की खोटा ? याची शहानिशा कोणी केली ! असे एक ना अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले असून टोल नाक्याचे व्यवस्थापक आदेश वाचून दाखवत असताना त्यांना किती अधिकार आहेत याबाबतीत नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकार्यांनी याबाबतची सखोल माहिती स्थानिकांना देणे आवश्यक असल्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघांचे आमदारांनी सदरचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडावा तरच यावर काहीतरी पर्याय निर्माण होईल अशीही स्थानिकांची मागणी आहे.
स्थानील लोकप्रतिनिधींनी नागरिकांना होणार्या त्रासाबाबत दाखवलेली उदासीनता आंदोलकांच्यात चर्चेचा विषय ठरला होती,कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा नियमित संपर्क कराड हे तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येत असतो तर कराड दक्षिण परिसरातील नागरिकांचे जिल्ह्याचे ठिकाण सातारा येथे जाणे येणे होत असल्याने टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,टोल प्रशासन आणि परिसरातील वाहन धारक यांची एकत्रित बैठक घेऊन या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असताना विद्यमान खासदार आमदारांची डोळेझाक नागरिकांच्या नजरेत आली आहे.
खरंच टोलवसुली वैध आहे का..?
तासवडे टोलप्रशासन ठराविक मर्जीतील लोकांचे फोन घेत असते किंवा माहिती देत असते यामुळे तासवडे टोलनाक्यावर सुरू असणारी टोल वसुली नियमाला अनुसरून आहे का ?याची खातरजमा कराड दक्षिण उत्तर लोकप्रतिनिधींनी करून घेणे क्रमप्राप्त आहे नाहीतर कुंपणानेच शेतखाण्याचा प्रकार वाढीस लागून मुजोर टोल प्रशासन जनतेची उघडउघड लूट करणार कारण सामान्य माणसाला कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही अशी नेहमीच तक्रार होत असते याबाबतची माहिती कराड डीवायएसपी अमोल ठाकूर यांनाही दिली असून याबाबतच्या सूचना टोल प्रशासनाला देतो अशीही माहिती त्यांनी दिली.
अधिवेशनात आवाज उठवा…!
कराड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार तसेच सातारा जिल्ह्याचे खासदारांनी विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी सध्या अधिवेशन सुरू असल्याने आवाज उठवावा अशीही मागणी सध्या होऊ लागली आहे विधासभेची निवडणूक तोंडावर आली असल्याने मतदारांची नाराजी काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट अथवा भाजप यांना परवडणारी नाही मतदारांची वक्रदृष्टी झाल्यावर काय होते याचा ट्रेलर नुकताच लोकसभेच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे.