कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे ही उदघाटन
कराड-
कराड येथील कोयना सहकारी बँकच्या प्रशासकिय कार्यालयचे उदघाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांच्या जयंतीदिनी सोमवार, दि. १५ जुलै रोज़ी दुपारी २ वाजता आयोजित केला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस अँड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी दिली.
स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सामाजिक न्याय मंत्री, माजी खासदर जयवंतराव आवळे, राज्यमंत्री आ सतेज पाटील, माजी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम,सांगलीचे खा. विशाल पाटील, आ संग्राम थोपटे,विचारवंत मधुकर भावे, आ.अरुण लाड,आ.जयंत आसगांवकर यासह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.काकांच्या मार्गदर्शना खाली बँकेचा वटवृक्ष झाला असून या बँकेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटनाचे औचित्य साधून काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ ही संचालक मंडळाने आयोजित केला आहे.
बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना बँकेचे चेअरमन रोहित पाटील म्हणाले,कोयना सहकारी बँकेचे स्थापना लोकनेते विलासकाका पाटील यांचे मार्गदर्शनाखाली 1996 साली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हस्ते झाली होती.आज बँकेच्या 11 शाखा व 1 विस्तारित कक्ष असून बँकेच्या ठेवी 177 कोटी,कर्ज वाटप 115 कोटी,असून एकत्रित व्यवसाय 300 कोटींचा आहे.बँकेने सतत अ वर्ग मिळवला असून संस्थापक अँड उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शना खाली बँक ग्राहक व सभासद यांचे पसंतीस उतरली आहे.
बँकेच्या या कार्यक्रमास सर्व सभासद, ठेवीदार,तालुक्यातील शेतकरी, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यावेळी केले.