पाटण:-
कोयना परिसरासह पाटण तालुक्यात काल शुक्रवारी दिवसभर थोडी उसंत घेत सायंकाळी पाच च्या सुमारास पाऊसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजता कोयना धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी तो वाढविण्यात आला असून सध्या 32 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने रात्री नऊ वाजता 40 हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे 42,100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात येत आहे. यामुळे कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असताना संगमनगर धक्का येथील जुना पुल व पाटण येथील मुळगाव पुल पाण्याखाली गेले आहेत. पूरपरिस्थितीत पुलावर अथवा वाहत्या पाण्यात कोणी उतरु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सद्या कोयना धरणातून प्रतीसेंकद 32 हजार क्यूसेक्सने नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदी काठावरील गावांना तसेच पाटण, कराड, सांगली या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात सध्या कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असून पुढील आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पावसाचे प्रमाण वाढते राहिल्यास पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे अगदी काठावर राहणार्या नागरिकांनी पूराचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.