पाटण/प्रतिनिधी:-
कोयना पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पुन्हा संततधार होत असलेल्या पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. मंगळवारी रात्री धरणातील साठा 105.25 टिएमसी हा पूर्ण क्षमतेचा म्हणजे 100 टक्के झाला असून कोयना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सद्या धरणात
प्रती सेकंद 15 हजार 469 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. हा पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने काल बुधवारी सायंकाळी 7 वा. धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे तीन फुटाने उघडून नदीपात्रात 28 हजार 396 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तर पायथा वीजगहातून 2100 क्युसेक्स असे एकूण 30 हजार 496 क्युसेक्स पाणी नदी पात्रात येत आहे. पावसाचे प्रमाण वाढते राहिल्यास परिस्थितीनुसार धरणांचे दरवाजे उचलण्यात येतील. यामुळे कोयना नदीला निर्माण होणार्या पूरस्थिती पासून सावध राहण्याचा इशारा नदी काठच्या गावांना देण्यात आला आहे.
गेले दोन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा संततधार सुरू झालेल्या पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत धरण 90 ते 95 टक्के पर्यंत भरते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरण ओव्हरफ्लो होते. काहीशी अशी परंपरा असलेले कोयना धरण चालू वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरणात येणार्या पाण्याची आवक हि निरंतर असल्याने या पाण्याचा धरणात साठा करता येत नाही. यामुळे धरणात जादा येणारे पाणी हे सोडल्या शिवाय पर्याय उरत नाही. सध्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने 15 हजार 500 क्युसेक्सची आवक सुरू आहे. धरणात येणारी आवक नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे तीन फुटांवर उचलून 28 हजार 396 क्युसेक्स तर पायथा वीजगहातून 2100 क्युसेक्स असे एकूण 30 हजार 496 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी 5 ते बुधवारी सायंकाळी 5 या 24 तासात झालेल्या पावसामध्ये कोयना येथे 61 मि.मी. एकूण- 5089 मि.मी. नवजा येथे 108 मि.मी. एकूण- 6014 मि.मी. महाबळेश्वर येथे 87 मि.मी. एकूण- 5796 मि.मी. नोंद झाली आहे. पुढील काळात संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन व कोयना नदीला निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदी काठावरील सांगली, कराड, पाटण शहरासह आदी गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी. व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.