पाटण :-
पाटण तालुक्यात भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून विक्रमसिंह पाटणकर दादा यांनी शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी पाटण तालुका दूध संघाची स्थापना केली. २५ वर्षे डोंगरदऱ्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यानी संघावर विश्वास दाखवल्यामुळेच आज या दूध संघाची चांगली प्रगती झालेली आहे. दादांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान व दूध संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याची झालेली आर्थिक उन्नती लक्षात घेता ह्या दूध संघास विक्रमसिंह पाटणकर सहकारी दूध संघ असे नामकरण करण्यात आले ही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. पाटण या दूध संघाचे मा. विक्रमसिंह पाटणकर सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ, लि. पाटण असा नामकरण सोहळा व रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ प्रसंगी सोनगाव ता. पाटण येथे बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते. सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, राष्ट्रवादी पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर याचे तालु्क्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील लोकांशी जनसंपर्क चांगला होता. रस्ता अभावी दूध घेवून जाण्यासाठी कोणतेही रस्ते नव्हते. हे लक्षात घेऊन स्त्याचे जाळे विणले. शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने विक्रमसिंह पाटणकर यांनी संघाची निर्मिती केली केली. हा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने येथे नैसर्गिक चारा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे येथील दूधाची प्रत उत्तम आहे. असे सांगताना आ. पाटील पुढे म्हणाले सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीशी चिवटपणे कार्यकर्ते उभे आहेत. लोकसभेत हवे तेवढे यश सरकारला मिळाले नाही आले नाही. त्यामुळेच हे सरकार धडाधड चुकीचे निर्णय घेत आहे. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. राजकारणात कोणत्याही थराला जाणार्या मंडळींपासून सावध रहा, असे आवाहन त्यानी शेवटी केले.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, डोंगर दूर्गम भागात फिरून दुध गोळा केले. संस्था अशा उभ्या राहत नाहीं. संस्था उभारताना कष्ट करावे लागतात. प्रामाणिक काम करून विश्वास संपादन करावे लागते डोंगरात भागातील शेतकरी दूध घेण्यासाठी कोणी ही येत नसल्याने भरडला जात होता. म्हणून लोकांचा मागणी वरूनच संघाची निर्मिती झाली. आजच्या घडीला तालुका दूध संघ चांगल्या प्रकारे सुरू आहे. शेतकऱ्याच्या दुधाला चांगला दरही मिळतोय आहे. संघातील दूध संकलनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चिलींट प्लँटबरोबर संघ स्वतःच वीजनिर्मिती करत आहे. तालुक्यात नुसता विकासाचा गवगवा केला जात आहे. येणाऱ्या निवडणूकीत सर्वांनी सज्ज रहावे. तांदूळ निवडताना महिला खडे बाजूला करतात तसे चुकीच्या लोकांना तुम्ही बाजूला करा. तरूणांच्या भविष्यासाठी १९८३ ची क्रांती पुन्हा घडवूया असे त्यानी सांगितले.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, सहकार क्षेत्रात तालुक्याची जडण घडण होत असताना सहकाराच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आपल्या सर्व सहकारी संस्था चांगल्या प्रकारे सुरू आहेत. सहकार चळवळीतील खरेदी विक्री संघ, दूध संघ, शेती उत्पन्न बाजार समितीला खऱ्याअर्थाने ताकद देण्याचे काम कै. तात्यासाहेब दिवशीकर, बाबुराव सुतार, पोपटराव पाटील, विलासराव पाटणकर, रघुनाथ साळुंखे, काळे गुरूजी यांनी केले. आज दूध संघात सर्वाधिक ३० हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. जिल्ह्यात संघ अग्रस्थानी आहे. दूध घेताना आम्ही पक्ष पहिला नाही. गट पाहिला नाही. दुधाला दर जास्त देण्याचा प्रयत्न केला. सत्ता नसल्यावर काय त्रास होतो हे सर्वांना महिती आहे. संघाची प्रगती कशी खुंटेल यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्या तूनही आपण पुरून उरलो. शरद पवार यांनी तालुक्याला ताकद दिली. त्यामुले पवार साहेबांच्या पाठीशी आपण ताकद उभी केली पाहिजे. करो या मरोची ही लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर दादांनी शेतकऱ्यांसाठी संघाची स्थापना केली आणि आज संघाला त्यास नाव दिले जात आहे ही अभिमानस्पद बाब आहे. संस्था टिकवणे हे अवघड काम तुम्ही करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला गेले आणि सरकार म्हणतंय महाराष्ट्राची प्रगती सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख , हर्षद कदम म्हणाले, संघास विक्रमसिंह पाटणकर दादांचेन नाव देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. दादांनी तालुकयात सहकाराची मुळे रुजवली. दादांनी उभ्या केलेल्या सर्व संस्था चांगल्या पध्दतीने सुरू आहेत. दूध संघाचा नावलौकिक जिल्ह्यात वाढतो आहे. तालुक्यात घाणेरडे राजकारण सुरू आहे. वेळ प्रत्येकाची येते. दादांकडून सुरुवातीच्या काळात मदत घेवून राजकीय पटलावर आलात त्यांनी दादांच्या स्वभावातील गुण घेऊन राजकारण करावे. असे त्यानी विरोधकांना सुनावले.
यावेळी हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार यानी प्रास्ताविक व स्वागत केले. व्हाईस चेअरमन शांताराम सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दूध संघाचे संस्थापक चेअरमन शंकरराव जाधव, अॅड. अविनाश जानुगडे, नगराध्यक्षा मंगल कांबळे, प्रतापराव देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य , चेअरमान, व्हाईस चेअरमन, नगरसेवक, नगरसेविका, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.