साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस उपाधीक्षक कार्यालयाची कारवाई
कराड/प्रतिनिधी-
कराड पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात बडगा उगारला. पोलीस उपाधीक्षकांच्या नेतृत्वात तब्बल चार वेगवेगळ्या पथकाने कारवाई करत गुरुवारी सात ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात ३६ लोकांवर कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एक लाख ५७ हजार ७८० तर १५ मोबाईल संच, पाच दुचाकी, देशी दारुच्या २३ बाटल्या मिळून तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अवैध व्यवसायाविरोधात विरोधात मोहिम आखण्याची सुचना दिली होती. त्यानुसार पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली अवैध्य व्यवसायावर कारवाई करण्यात आली. त्यात शहर परिसरातील कार्वे नाका, मंडई, बसस्थानक परिसर, मलकापूर, नवग्रह मंदीर परिसर, वारुंजी फाटा, खोडशी अशा सात वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यात ३६ जणांवर कारवाई केली. त्या छाप्यात जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एक लाख ५७ हजारांचा मुद्दमेला जप्त झाला. या व्यतिरिक्त १५ मोबाईल, पाच दुचाकी, देशी दारुच्या २३ बाटल्या असा तीन लाख ८० हजारांचा मुददेमाल जप्त केला आहे.