राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राज्यातील विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली आणि आढावा घेतला. आता लवकरच महाराष्ट्रात निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. तशातच आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक मोठी घोषणा केली. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला. सयाजी शिंदे यांनी अभिनयक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पक्षप्रवेशासोबतच त्यांना राष्ट्रवादी पक्षात विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक करण्यात आले.
सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अजित पवार म्हणाले, “मी जास्त चित्रपट पाहत नाही पण सयाजी शिंदे यांचे काही चित्रपट पाहिले आहेत. प्रत्येकाला काही अभिनेते, काही अभिनेत्री आवडतात. सयाजी शिंदे यांनी एक वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्रातील एखादा कलाकार किंवा एखादा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात पुढे गेल्यास अभिमान वाटतो. सयाजी शिंदे यांचे चित्रपट समाजामध्ये जागरूकता वाढवतात. त्यांनी उत्कृष्ट अशी पात्रे साकारली आहेत. त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे.”
“सयाजी शिंदे यांना झाडांची फारच आवड आहे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड करतात. अनेकदा स्थानिक पक्ष सरकारकडून काही अडचणी येतात. ते पक्षात आले हे महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी कोणती जबाबदारी द्यायची यायची सखोल चर्चा झाली. ते पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील. पुढच्या राजकीय प्रवासाबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सयाजीराव यांचा आदर आणि सन्मान राखला जाईल. यामध्ये सहकारी किंवा कार्यकर्त्यांकडून अडचण येणार नाही,” असेही अजित पवार म्हणाले.
राजकारणातील यात्रा सामाजिक कार्याप्रमाणे यशस्वी राहिल अशी मला खात्री आहे. आगामी काळातील लोक देखील आमच्यासोबत जोडले जातील, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.