कराड/प्रतिनिधीः-
महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014 ला मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली त्यात यशही आले. याही वेळी त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र ही निवडणूक त्यांना सोप्पी नाही. गेल्या पाच वर्षात भाजपा नेते अतुल भोसले यांनीही जोरदार तयारी केली आहे. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यात अतुल भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच घेरण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. अतुल भोसले यांना ताकद दिली आहे. कोट्यवधींची विकास कामे अतुल भोसलेंनी कराड दक्षिणमध्ये आणली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे. तर 2019 च्या निवडणूकीत अपक्ष लढलेले अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी या निवडणूकीनंतर काँगे्रसमध्ये प्रवेश केला आणि सद्या ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत प्रचारात सक्रिय आहेत. ही जमेची बाजू आहे. उंडाळकरांना माननारा मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटी-तटीची होवू शकते, असे अनेकांचे मत आहे. स्थानिक गटांच्या आधारे निवडणूकीची रणनिती निश्चित करण्यावर दोन्हीही उमेदवारांनी भर दिला आहे.
भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांनी यापूर्वी 2 वेळा कराड दक्षिणमधून नशीब आजमावले. पण त्यावेळी त्यांना यश आले नाही. मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी सातत्याने विकास कामे व समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच कराड दक्षिण अशी मतदार संघाची ओळख आहे. पण ही ओळख पुसण्यासाठी अतुल भोसलेंकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघ हा पहिल्यापासुन आजअखेर काँग्रेसच्या विचारांचा राखण्यात नेत्यांना यश आले आहे. या मतदार संघाचे आत्तापर्यंत फक्त यशवंतराव चव्हाण, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या तीनच नेत्यांनी नेतृत्व केले. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघापैकी कराड दक्षिण हा एकमेव काँग्रेसचा मतदार संघ आहे.
मतदार संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांना अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचीही साथ मिळाली आहे. सातारा जिल्हा बँकेतील राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि अॅड. उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रीत लढत सत्ता ताब्यात ठेवली.
कराड शहर व मलकापुरमधील ’उलथा-पालथ’कुणाच्या पथ्थावर…
कराड दक्षिणच्या राजकारणात मतदारांच्या ’बेरीज-वजाबाकी’वर महत्वपूर्ण म्हणुन कराड शहर व मलकापुर याकडे बघण्यात येत असून गत निवडणुकीपासुन ’बरेचं’ फेरबद्दल झाल्याचे प्रामुख्याने दिसुन येत असुन कराड शहर व मलकापुर मध्ये नगरसेवकाच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या गट-तटाची वेगवेळ्या पक्ष व नेत्यांच्या तुन विभागणी झाल्याने येवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ’जोरदार रंगत’ पाहण्यात येवू शकते असे जाणकार राजकीय विश्लेषकातुन बोलले जात आहे.